सागरेश्वर अभयारण्याच्या कुंपनाला भगदाड
वन्यप्राणी बाहेर ; पिकांचे मोठे नुकसान
उमेश पाटील -सांगली
महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य असणारे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या कुंपनाला जागोजागी भगदाड पडले असुन यामधून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. बाहेर पडलेल्या वन्यप्राण्यांकडुन शेतपिकांचे अतोनात नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
सागरेश्वर अभयारण्याचा विस्तार 10.34 चौ.किमी क्षेत्रात आहे. अभयारण्यात हरिणांसह, साळींदर , रानडुक्कर, ससे, मोर यासह अन्य जातीचे प्राणी मोठ्या संख्येने आहेत. अभयारण्याच्या सभोवती पुर्वी सुरक्षेसाठी तारेचे कुंपन होते. परंतु यामधून वन्यप्राणी बाहेर पडुन आसपासच्या शेतपिकाचे नुकसान करत होते. नुकसानग्रस्त शेतकर्यानी अनेक वर्ष मागणी केल्यानंतर अभयारण्याला चेनलिंग जाळीचे कुंपन मंजुर करण्यात आले. टप्प्याटप्प्याने निधी मंजूर होइल तसे कुंपनाचे काम करण्यात आले.परंतु याही कुपनाला सध्या जागोजागी भगदाड पडले आहेत. यामधून रात्रीच्या वेळेस वन्यप्राणी बाहेर पडुन ऊसपिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान करत आहेत. तर बाहेर पडलेल्या वन्यप्राण्यांवरही भटक्या कुत्र्याकडुन हल्ले होऊन वन्यप्राणी मृत्यूमुखी पडत आहेत. याकडे अभयारण्य प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.
वरिष्ठांचे अभयारण्याकडे दुर्लक्ष
अभयारण्यास गत पाच ते सात वर्षांत कार्यशुन्य अधिकारी लाभल्याने अभयारण्याचा विकासच खुंटला आहे. अधिकार्याना असणारी शहराची ओढ , कर्मचार्यावरील नियंत्रणाचा अभाव , भ्रष्टाचार यामुळे अभयारण्य विकासापासुन कोसो मैल दुर आहे. अभयारण्याकडे वरिष्ठ अधिकार्यानी लक्ष देऊन अभयारण्याचा कारभारात सुधारणा करण्याची मागणी वन्यप्रेमीतुन होत आहे.