साताऱ्यात एका दिवसात 30 किलोमीटरचा रस्ता तयार करून प्रस्थापित केला विश्वविक्रम
पुसेगाव ते म्हासुर्णे रस्ता तयार करून महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉनचे राज्याला अनोखे अभिवादन
प्रतीक मिसाळ -सातारा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३० किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार करत विश्वविक्रम स्थापित केला आहे . या विश्वविक्रमातून महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले आहे . या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे . ३० किलोमीटरचा हा रस्ता रविवार , दि . ३० मे२०२१ रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री २ वाजेपर्यंत तयार करण्यात आला . साडेतीन मीटर रुंद आणि ३० किलोमीटर लांबीचा हा रस्ता पुसेगाव , जायगाव , औंध , म्हासूर्णे असा होता . जवळपास ४७४ कामगार आणि २५० वाहने व मशिनरीच्या साहाय्याने हे काम पूर्ण झाले . कोविडसंदर्भात केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला . सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार , अधीक्षक अभियंता मुंगळीवार , सदा साळुके , माजी अभियंता एस.पी. दराडे आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले . यावेळी राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जगदीश कदम , संचालिका मोहना कदम , अर्थ संचालक डॉ . राजेंद्र हिरेमठ , प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे , सरव्यवस्थापक रोहिदास पिसाळ , प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते . जगदीश कदम म्हणाले , “ पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन कंपनीला पुसेगाव ते म्हासुर्णे या ४७ किलोमीटर रस्त्याचे काम हॅमअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाले होते . यंदा महाराष्ट्र राज्य एकसष्टी साजरी करत असल्याने राज्याला मानवंदना देण्यासाठी , या कोविडच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मकता पेरण्यासाठी हा विश्वविक्रम करण्याची संकल्पना पुढे आली . राजपथ इन्फ्राकॉनने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने एका दिवसात ३० किलोमीटर डांबरीकरणाचा रस्ता तयार करून विश्वविक्रम करण्याचा संकल्प पूर्ण केला . " सर्वांच्या सहकार्यामुळेच राजपथ कंपनी हा विश्वविक्रम पुर्णत्वास नेऊ शकली , " असे जगदीश कदम यांनी नमूद केले . उल्हास देबडवार म्हणाले , “ करोनामुळे कामाला अडथळा येत होता . पण या कठीण काळात अशी अनोखी कल्पना जगदीश कदम व राजपथने मांडली . अशा नकारात्मक वातावरणात हा संकल्प पूर्ण करून प्रेरणा देण्याचे काम राजपथने केले आहे . राज्यात पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध असून , अशा कार्यक्षम कंत्राटदारांनी दर्जेदार कामे कमी वेळेत केली तर राज्यातील कामे कमी वेळेत केली तर राज्यातील जनतेला चांगले रस्ते मिळतील.या रस्त्यांची गुणवत्ता , दर्जा नियमित स्वरूपात तपासला जात आहे . ”
*असा झाला विश्वविक्रम*
या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राजपथ टीमने सूक्ष्म नियोजन केले . ३० किलोमीटरच्या या रस्त्याला सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आले . प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक होते . या कामासाठी एकूण ११,००० मेट्रीक टन बिटुमन काँक्रीट , त्यासाठी आठ हॉट मिक्स प्लांट होते . काँक्रीटचे हे मटेरीअल पसरविण्यासाठी सहा पेव्हर , १२ टँडम रोलर व सहा पीटीआर वापरण्यात आले . या मटेरीअलची ने - आण करण्यासाठी एकूण १८० हायवा टिप्पर वापरण्यात आले . प्रकल्प व्यवस्थापक , तीन हायवे इंजिनिअर , दोन क्वालिटी इंजिनिअर , दोन सर्व्हेअर आणि ७१ कर्मचारी असे एकूण ७ ९ कर्मचारी एका टीममध्ये होते . एकूण सहा भागांचे मिळून ४७४ कर्मचारी पुर्ण कामासाठी तैनात होते . यासाठी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती .या अनोख्या विश्वविक्रमामुळे साताऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.