म्हैसाळ केंद्रातील 33 आशा वर्कर्सना आरोग्य विम्याचे कवच
जिल्हा परिषद अध्यक्षांचा पुढाकार, स्वखर्चातून प्रत्येकी एक लाखांचा विमा उतरविणार
सुधीर पाटील -सांगली
कोरोनाच्या महामारीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या डॉक्टर्स, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांना अल्प मानधन मिळते, ही वस्तुस्थिती आहे. पण, भविष्यात अशा महामारीचा सामना करण्यासाठी म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या चार गावातील 33 आशा वर्कर्सना स्वखर्चातून प्रत्येकी एक लाख रुपयांचा आरोग्य विमा कवच देणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे यांनी दिली. म्हैसाळ येथे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. म्हैसाळ आरोग्य केंद्रांतर्गत चार गावे येतात. यामध्ये म्हैसाळ 17, वड्डी चार, बोलवाड तीन, टाकळी सहा आणि विजयनगर तीन अशा एकूण 33 आशा वर्कर्सना विमा दिला जाणार असल्याचे कोरे यांनी सांगितले.