मुरबाड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिट गारांचा खच
सुधाकर वाघ-मुरबाड
मुरबाड तालुक्यात मार्दी, मोरोशी भागात रविवारी सायंकाळी वादळी वारा व गारांचा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आंबा व फळबागांचे मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच मेर्दी लोत्याचीवाडी येथे गारपिठ व वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने घरावरील कौले फुटल्याने अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. तसेच वाऱ्यामुळे विद्युत ट्रान्फार्मर पडल्याने या भागात विज पुरवठा खंडीत झाला असल्याचे ठाणे जिल्हा परिषद सदस्य गोविंद भला यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यापासून सतत वातावरणात बदल होत असल्याने मागील 22 मार्चला सुद्धा तालुक्यातील अवकाळी वादळी पावसाने आंबा बागायतदारांचे नुकसान झाले होते. तर गुरुवारी 29 एप्रिल रोजी वादळी वाऱ्याचा कहर फळबाग व बागायत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पाहायला मिळाला. तर रविवारी ता.2 मे रोजी पुन्हा मुरबाड तालुक्यातील मार्दी, मोरोशी भागात गारपिटीचा अवकाळी पाऊस झाला आहे. जोराच्या गारपिटीचा अक्षरशः खच पडला होता. जोरदार गारपिठ झाल्याने आंबा बागा व फळभाज्या लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे. तसेच काही घरावरील कौले फुटुन नुकसान झाले आहे. पंचनामे करुन भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.