Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुण्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुण्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा आढावा

मिलिंद लोहार -पुणे



आरोग्य सुविधांसह ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमिडिसिव्हीर उपलब्धतेसोबतच उपचार सुविधांमध्ये कमतरता भासू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील  -उपमुख्यमंत्री अजित पवार
■ कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा
■ ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर
■ ग्रामीण आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याची गरज

          कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्धता यासोबतच कोरोनाबाधित रूग्णांना उपचार सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. ‘कोरोना’ची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. लसीकरणाला गती देण्यावर राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

           पुण्यातील विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 'कोरोना' विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये कमतरता भासणार नाही, यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णांला आवश्यक  वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सुविधांमध्ये तातडीने वाढ करा, ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढू नये म्हणून सजग राहून नियोजन करणे आवश्यक आहे. आवश्यक तिथे खाटांची गरज, उपलब्धता व इतर सामग्री यासाठी सतत समन्वय ठेवावा. राज्यशासनाने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने आवश्यक निधीची तरतुद केलेली आहे. परंतू लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने नागरिकांनी लगेच लस केंद्रांवर गर्दी करू नये, कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना महामारीच्या संकटकाळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांना त्याचा लाभ होईल, अशा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.  

                 महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.

            खासदार गिरीश बापट म्हणाले, लसीकरण नियोजन व्यवस्थितपणे होणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या समन्वयातून जनतेला अधिकाधिक चांगल्या आरोग्य सेवा देवू शकू, असे त्यांनी सांगितले.  

            खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांबाबत त्यांच्या आरोग्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमिडिसिव्हीर याबाबतचे नियोजन चांगले आहे. क्रियाशील रुग्णसंख्या घटते आहे, ही चांगलील बाब असून येणाऱ्या कालावधीतही रुग्णसंख्या विचारात घेत नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिदधार्थ शिरोळे, आमदार चेतन तुपे यांनीही महत्वाचे विषय मांडले.

              डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, लसीकरणाला गती देण्याची गरज असून कोरोना संसर्ग नक्की कमी होईल, घाबरून जाण्याची काही कारण नाही, असे सांगून कोविड -19 च्या नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

                      विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ट्रॅकिंग व टेस्टिंग, कंटेनमेंट झोन, लसीकरण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णसंख्येचा तपशील, रुग्णवाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, ऑक्सिजन मागणी, ऑक्सिजन व रेमडेसीवीर मागणी व सद्यस्थिती  तसेच पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती सादरीकरणाद्वारे दिली. 

                          जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ऑक्सिजन, रेमडेसीविरची जिल्ह्याची मागणी व सुरळीत पुरवठा होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी डॉ. देशमुख यांनी दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies