मुरबाड तालुक्यातील गारपीटग्रस्तांना उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्याकडुन मदत
सुधाकर वाघ-मुरबाड
तालुक्यातील मेर्दी, आल्याचीवाडी, लोत्याचीवाडी येथे गारपिटीने झालेल्या नुकसानीची जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी मंगळवारी पाहणी केली. तसेच 9 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची रोख मदत केली.
तालुक्याच्या दुर्गम भागा असलेल्या मेर्दी, आल्याचीवाडी, लोत्याचीवाडी परिसरात 2 मे रोजी गारपीट झाली होती. त्यात अनेक शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिक, भाजीपाल्याचे तसेच घरांची कौले , पत्रे फुटुन नुकसान झाले होते. या नुकसानीची ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी काल पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांना दिलासा दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन सुभाष पवार यांनी दिले. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, जिल्हा परिषदेचे सदस्य गोविंद भला आदी उपस्थित होते.
या प्रसंगी नुकसान झालेल्या लोकांना पत्रे व कौले तत्काळ घेण्यासाठी सुभाष पवार यांनी 9 शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत केली. तसेच राज्य सरकारकडून 5 ते 6 दिवसात नुकसानभरपाई मिळवून देण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. या मदतीबद्दल शेतकऱ्यांनी पवार यांचे आभार मानले.