लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी लोकांची झुंबड...
भिमराव कांबळे -कोल्हापुर
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या आणि रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शनिवारी ( १५ मे) मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला. गुरुवारी रात्री जिल्हा प्रशासनाने याबाबत नियमावली जाहीर केली. या कालावधीत अत्यावश्यक बाबी वगळता इतर सर्व उद्योग, व्यापारी आस्थापना, सेवा पुरवणारे घटक बंद ठेवण्यात येणार आहेत. यापार्श्वभूमीवर आज शहरातील शिंगोशी मार्केट, कपिलतीर्थ मार्केट, लक्ष्मीपुरी मार्केट, ऋणमुक्तेश्वर मार्केट या बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली. जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी किराणा मालाच्या दुकानासमोर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. नियम धाब्यावर बसवत नागरिकांनी जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी केल्याने, त्याच्या नियंत्रणासाठी प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.