कोल्हापुरातील एमआयडीसी आठ दिवस बंद राहणार : आ. चंद्रकांत जाधव
भिमराव कांबळे -कोल्हापुर
जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील एमआयडीसी रविवार १६ मे पासून २३ मे पर्यंत आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय औद्योगिक संघटनांनी घेतला आहे. अशी माहिती आ. चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हर इंजक्शनची कमतरता, या पार्श्वभूमीवर कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापुरातील एमआयडीसी बंद ठेवणेबाबत औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची जबाबदारी आ. चंद्रकांत जाधव यांच्याकडे होती. यानुसार आ. जाधव यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, मॅकचे अध्यक्ष गोरख माळी, हर्षद दलाल यांच्यासाेबत चर्चा केली. यावेळी कडकडीत लॉकडाऊन करण्यासाठी उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. जाधव यांनी केले. या आवाहनास प्रतिसाद देत रविवार १६ मे पासून २३ मे पर्यंत जिल्ह्यातील एमआयडीसी बंद ठेवण्याचा निर्णय औद्योगिक संघटनांनी घेतला आहे.