पंचगंगा स्मशानभूमीच्या दानपेटीतून मिळाली आश्चर्यकारक रक्कम...
भिमराव कांबळे -कोल्हापूर
पंचगंगा स्मशानभूमीत असलेली दानपेटी महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांच्या उपस्थितीत आज खुली करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी ही दानपेटी खुली केली नव्हती. त्यामुळं या दानपेटीत ९ लाख ९ हजार ३३४ रुपये इतकी रक्कम जमा झाली होती.
कोल्हापूर महापालिकेतर्फे पंचगंगा स्मशानभूमीसह शहरातील अन्य स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार केले जातात. एका अंत्यविधीसाठी कमीत कमी तीन हजार रुपये खर्च येतो. यामध्ये किमान १५० शेणी लागतात, तर लाकूड तीनशे किलो लागते. त्यामुळे अंत्यविधी झाल्यानंतर नागरिकांनी स्वेच्छेने दान करण्यासाठी स्मशानभूमीत दानपेटी ठेवण्यात आली आहे. ही दानपेटी प्रत्येक वर्षी खुली केली जाते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही दानपेटी २०१९ नंतर आज खुली करण्यात आली. उपायुक्त निखिल मोरे यांच्या उपस्थितीत ही दानपेटी खुली करण्यात आली. यामध्ये ९ लाख ९ हजार ३३४ रुपये इतका स्वेच्छा निधी जमा झाला होता. तर २०१९ साली हीच दानाची रक्कम साडे तीन लाख रुपये होती. २०१९ आणि २०२० या वर्षात नागरिकांनी सढळ हाताने मदत करत दानपेटीत ९ लाख ९ हजार ३३४ रुपये नोटा आणि नाणी स्वरूपात जमा केले आहेत.
यावेळी सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.