सागर कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने वातानुकुलीत सुसज्ज सेमी आयसीयू कोविड सेंटरचे लोकार्पण संपन्न
ओंकार रेळेकर-चिपळूण
आपण समाजाचं देणं लागतो, या भावनेतून काम करणं हा दैनिक सागरचे संस्थापक-संपादक माजी आमदार स्व. निशिकांत तथा नाना जोशी यांचा मूळ स्वभाव. त्यांनी आयुष्यभर दैनिक सागरच्या माध्यमातून कोकणच्या विकासासाठी आपली लेखणी चालवली, सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात आवाज उठविला. त्यांचे हेच सामाजिक कार्य त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती शुभदा जोशी, उद्योजक प्रशांत उर्फ राजू जोशी हे सागर कर्तव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून पुढे चालवत आहेत. कामथे उपजिल्हा रुग्णालयातील सेमी आयसीयू कोविड सेंटर हा त्याचाच एक भाग आहे. यानिमित्ताने स्व. नानांच्या कार्याची सर्वांना पुन्हा एकदा आठवण होईल, असे सांगत सागर कर्तव्य फाऊंडेशने स्व. नाना जोशी यांच्या नावाने उभारलेल्या या आरोग्य सुविधेबद्दल राज्याचे माजी मंत्री, शिवसेनेचे प्रवक्ते, आमदार भास्करशेठ जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कामथे उपजिल्हा रुग्णालयातील आनंदी जोशी सभागृहात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या सूचनेनुसार सागर कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने वातानुकुलीत सुसज्ज सेमी आयसीयू कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. रुग्णांना मानसिक समाधान लाभावे व आल्हाददायी वातावरण रहावे, यासाठी सकारत्मक संदेश देणारी चित्रे, सुमधुर संगीत अशी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या आरोग्य सुविधांचे लोकार्पण आज रविवारी (दि. २९) रुग्णालयातील परिसेविका स्नेहा चौधरी, परिचारिका बजंत्री यांच्या हस्ते फीत कापून तर आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्व. नानांचे कार्य समाजाला माहीत आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा सागर कर्तव्य फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत उर्फ राजू जोशी पुढे चालवत आहेत. फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी उत्तम दर्जाच्या सुविधा असणारे सेमी आयसीयू सेंटर उभारून दिले आहे. जनतेच्या व शासनाच्या वतीने मी सागर कर्तव्य फाऊंडेशनला मनापासून धन्यवाद देतो, अशी भावना आमदार शेखर निकम यांनी या वेळी व्यक्त केली. या कोविड सेंटरसाठी आवश्यकता असल्यास दोन डॉक्टर व नर्सेस स्टाफ घ्यावा, त्यांचे मानधन सागर कर्तव्य फाऊंडेशन देईल, तसेच कोरोना आटोक्यात येईपर्यंत जी जी गरज भासेल ती आपण पूर्ण करू, अशी ग्वाही फाऊंडेशनचे अध्यक्ष राजू जोशी यांनी दिली असल्याचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी या वेळी जाहीर केले.कार्यक्रमाला सभापती रिया कांबळे, माजी सभापती शौकत मुकादम, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, डॉ. प्रकाश पाटणकर, कामथे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. आर. आर. भोई, डॉ. असित नरवडे, डॉ. संतोष हंकारे, डॉ. सतीश गवळे, आरपीआयचे राजू जाधव, संदेश मोहिते, नंदू थरवळ, शाहनवाज शाह, परेश पवार, रामशेठ रेडीज, रमण डांगे, वैभव निवाते, बापू साडविलकर, राजेंद्र खातू, किशोर कदम, न. प. कर्मचारी, कामथे रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, दैनिक सागर कर्मचारी, मिस्टिकल कंपनी स्टाफ आदी उपस्थित होते.या सेंटरच्या उभारणीत दैनिक सागरचे लक्ष्मण शेलार, योगेश बांडागळे, मिस्टिकल कपंनी व्यवस्थापनाचे विजय उर्फ नाना परचुरे, महेश पवार, जनार्दन होळकर, दीपाली खोचरे यांनी मोलाचे योगदान दिले.