तारळे येथे जिलेटीन कांड्याच्या साठ्यासह एकाला अटक ;सातारा दहशतवाद विरोधी पथकाचा छापा
१०३ किलो वजनाचा साठा जप्त
प्रतीक मिसाळ-सातारा
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन कांड्या ठेवण्याची घटना ताजी असताना सातारा जिल्हा विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने जिलेटीन कांड्या व डीटोनेटर्ससह एकाला अटक केली आहे . गोविंदसिंग बाळुसिंग राजपूत ( यादव ) रा.तारळे , ता.पाटण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून ८३६ जिलेटीन कांड्या ( १०३ किलो वजन ) व बोलेरो वाहन जप्त केले आहे .
पोलीस व घटनास्थळा वरून मिळालेल्या माहितीनुसार राजपूत हा सहा वर्षांपासून ताराळ्यात राहत असून तो मूळचा राजस्थानचा आहे विहीर खुदाई साठी ब्लास्टिंगचा त्याचा व्यवसाय आहे.त्याच्याकडे विहीर खुदाईचा परवाना आहे पण जिलेटीन साठ्याचा परवाना नाही.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात बेकायदा स्फोटकांचे साठे व वाहतूक यावर कारवाई करण्याचे आदेश सातारा जिल्हा विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाला दिले होते . त्यानुसार बेकायदासाठ्याची माहिती घेण्याचा शोध सुरू असताना सातारा जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांना तारळे , ता.पाटण येथे बेकायदेशीर स्फोटकांचा साठा होत असल्याची गुप्त माहिती मिळाली . त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांच्या अधिपत्याखाली दहशतवाद विरोधी पथकाने गोपनीय माहितीची खातर जमा करून तारळे , ता.पाटण येथील गोविंदसिंग बाळुसिंग राजपूत ( यादव ) याच्या राहत्या घराची झडती घेतली तेव्हा तेथील कुलूपबंद शौचालयात जिलेटीन कांड्याचे चार बॉक्स आढळून आले . तसेच अधिक झडती घेतली असता घराच्या दारात उभा असलेल्या बोलेरो वाहनातून देखील जिलेटीन कांड्या व डीटोनेटर्स आढळून आले. एकूण ८३६ जिलेटीन कांड्या व बोलेरो वाहनासह गोविंदसिंग बाळुसिंग राजपूत ( यादव ) याला अटक करण्यात आली आहे .