उल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना
दिपक पाटील -कर्जत
कर्जत तालुक्यात वर्षा पर्यटनावर प्रशासनाकडून बंदी जाहीर करण्यात आली आहे. असे असतानाही नेरळ बिरदोले येथे वर्षा सहलीसाठी आलेल्यांपैकी उल्हास नदीत एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार समजताच नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी स्थानिकांच्या मदतीने सदर तरुणाचा नदीपात्रात शोध सुरु केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि नेरळ बिरदोले भागात एका फार्म हाऊसवर मुंबई येथून एकूण ८ पर्यटक हे शनिवारी दाखल झाले होते. रात्री मुक्काम केल्यावर रविवारी सकाळी ते येथून जवळच असलेल्या उल्हास नदीवर मौजमजा करण्यासाठी गेले. साधारण ११ च्या सुमारास त्यांच्यापैकी समीर सतीश देवळेकर वय २२ हा तरुण नदीपात्रात बसला होता. कर्जत तालुक्यात गेले काही दिवस दमदार पाऊस असल्याने नदीला पाणी मोठ्या प्रमाणात होते. अशात समीरचा पाण्यात तोल गेल्याने तो नदीच्या प्रवाहात वाहत गेला. काठावर बसलेल्या समीरच्या मित्रांनी हा प्रकार पाहिला तसे त्यांनी देखील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करून पहिला मात्र नदीच्या पाण्याचा प्रवाह आणि तोवर वाहून गेलेला समीर यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांनी हि घटना स्थानिकांच्या मदतीने नेरळ पोलिसांना कळवली. घटना समजताच नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.बांगरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे, पोलीस नाईक समीर भोईर, केशव नागरगोजे, वैभव बारगजे, शेखर मोरे हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले. घटनास्थळाची पाहणी करत त्यांनी स्थानिकांच्या मदतीने समीरचा शोध घेण्यास सुरवात केली. तर समीर देवळेकर हा प्रभादेवी मुंबई येथील राहणारा असून त्यासह आलेले सर्व जण मुंबई महापालिकेसाठी ठेकेदारीमध्ये विनामास्क नागरिकांच्या दंड वसुलीचे काम करत असल्याचे समजते.
वर्षासहलीसाठी पर्यटकांच्या शकला, पोलिसांच्या डोक्याला ताप
गेल्या काही वर्षात कर्जत तालुक्यातील वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांचा अपघात होऊन त्यातून त्यांचे मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे २०१७ पासून कर्जत तालुक्यातील वर्षा सहलींवर पर्यटन बंदी प्रशासनाच्या वतीने सलग जाहीर केली जात आहे. तसेच यावर्षी सुद्धा वर्षासहलीवर बंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे शनिवार रविवार असल्याने नेरळ परिसरात सहाय्य्क पोलीस निरीक्षक एस.एस.बांगरे यांच्या माध्यमातुन धबधबे, धरण याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर अनेक पर्यटक त्यामुळे माघारी फिरले. मात्र मुंबईवरून आलेले हे पर्यटक जिथे गावकरी देखील जात नाही अशा नदीच्या ठिकाणी जाऊन मौजमजा करीत होते. आणि त्यातूच अंदाज न आल्याने समीर वाहून गेला. बंदी असतानाही पर्यटक वर्षा सहलीसाठी अशा अघोरी क्लुप्त्या लढवीत आहेत. मात्र त्यामुळे चोख बंदोबस्त ठेवूनही पोलिसांच्या डोक्याचा ताप वाढत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी कुठे कुठे लक्ष द्यायचे असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे.