मराठा आरक्षण मुद्यांवरून उदयनराजे आक्रमक
नाकर्ते राज्यकर्त्यांनो धाडस असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या;खा.उदयनराजे भोसले
प्रतीक मिसाळ- सातारा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कोल्हापुरात खासदार संभाजी छत्रपती यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे . त्या अनुषंगाने आज साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुणे येथे जाऊन खासदार संभाजी छत्रपती यांची भेट घेतली . यावेळी खासदार भोसले यांनी राज्यकर्त्यांवर टीका केली . " राज्यकर्त्यांकडून मराठा समाजात दुफळी निर्माण करण्याचे घातक राजकारण केले जात आहे . सरकारमध्ये जर धाडस असेल तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं , " असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला .
खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुणे येथे खासदार संभाजी छत्रपती यांची भेट घेतली . यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणावर दोघांमध्ये चर्चा पार पडली . यावेळी पार पडलेल्या चर्चेनंतर दोन्ही राजेंनी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला . यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पाठींबा दर्शवला .
यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले , " दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही . आम्हाला कोणत्याही स्वरूपात आरक्षण हवं आहे . विशेष अधिवेशनही घ्यावं लागलं तरी चालेल . ते घ्यावं आणि कोणत्याही स्वरूपात मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं .
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी राज्यसरकारवर गंभीर टीका केली . या राज्यसरकारला मराठा समाजबांधवांना आरक्षण द्यावं लागणारच आहे . केंद्राकडून आरक्षण मिळवण्याचं आम्ही बघू मात्र , राज्यातील आरक्षणाचा प्रश्न राज्यकर्त्यांनी सोडवणे गरजेचं आहे . मात्र , या ठिकाणी राज्यकर्त्यांकडून मराठा समाजात दुफळी निर्माण करण्याचं घातक राजकारण केलं जात आहे , ते त्यांनी करू नये , असेही भोसले यांनी यावेळी सांगितले .