सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे फळ शाहूपुरीवासियांनी का भोगायचे - आ . शिवेंद्रसिंहराजेंचा सवाल
- एमएसईबीने तातडीने पथदिवे सुरु करावेत ; अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा दिला इशारा
प्रतीक मिसाळ सातारा
तब्बल २ कोटी वीज बिल थकल्याने वीज वितरण कंपनीने शाहूपुरीमधील स्ट्रीट लाईटचे कनेक्शन तोडले आहे . सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शाहूपुरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तारूढ आघाडीच्या भोंगळ , मनमानी , नियोजनशून्य आणि भ्रष्टाचारी कारभाराचे हे उत्तम उदाहरण असून त्याचा फटका शाहूपुरीवासीयांना बसत आहे . काहीही कारण आणि चूक नसताना नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे . हद्दवाढ झाली असल्याने वीज वितरण कंपनीने सातारा नगर परिषदेकडून बिलाची रक्कम वसूल करावी आणि नगर पालिकेनेही हे बिल तातडीने भरावे आणि शाहूपुरीतील पथदिवे त्वरित सुरू करावेत अन्यथा लोकहितासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल , असा इशारा आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे . सातारा जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहूपुरीचा नुकताच सातारा शहराच्या हद्दवाढीत समावेश झाला आहे . दरम्यान , सुमारे २ कोटी वीज बिल थकल्याने वीज वितरण कंपनीने शाहूपुरीतील पथदिव्यांचे कनेक्शन तोडले असून संपूर्ण शाहूपुरी अंधारात बुडाली आहे . अनेक कॉलन्या , वसाहती आणि मोठमोठे बंगले यांच्या करातून शाहूपुरी ग्रामपंचायतीला मोठा निधी मिळत असतानाही स्ट्रीट लाईटचे २ कोटी वीज बिल थकल्याने कनेक्शन तोडले गेले . यामुळे ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांच्या सुरु असणाऱ्या भ्रष्ट कारभाराचा फुगा अखेर फुटला आहे . वीज कनेक्शन तोडल्यामुळे संपूर्ण शाहूपुरी अंधारात बुडाली असून सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे . विविध प्रकारचे कर आणि शासकीय अनुदान मिळत असतानाही विजेचे २ कोटी बिल थकीत राहिल्याने विदयुत कनेक्शन तोडले गेले , हे सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे उत्तम उदाहरण आहे .
सत्ता आहे म्हणून वाट्टेल ते रेटून करायचे आणि मिळेल तिथे हात मारायचा हाच अजेंडा सत्ताधाऱ्यांचा होता हे आता सिद्ध झाले आहे . ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी आघाडीवर आजपर्यंत भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी झाल्या , अनेकदा वादंग झाले पण सत्ता आणि हुकूमशाही , दडपशाहीच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी शाहीपुरीवासीयांचा पैसा ओरबाडून खाल्ला , हे या प्रकारामुळे उघड झाले आहे . भौगोलिकदृष्ट्या मोठ्या आकाराची ग्रामपंचायत असलेल्या शाहूपुरी ग्रामपंचायतीचे उत्पन्न मोठे आहे . असे असताना वीज बिल २ कोटी थकणे आणि त्यामुळे कनेक्शन तोडले जात असेल तर नागरिकांचा कररुपी पैसा गेला कुठे ? याचे उत्तर आता मिळाले असून सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार अखेर उघड झाला आहे . हद्दवाढीमुळे आता शाहूपुरी भाग सातारा नगर पंचायतीमध्ये समाविष्ट झाला आहे . त्यामुळे वीज वितरण कंपनीने सातारा पालिकेकडून थकीत बिलाची रक्कम वसूल करावी . तसेच लोकांना अंधारात न ठेवता सातारा नगर पालिकेनेही थकलेले वीज बिल त्वरित भरावे आणि शाहूपुरीवासीयांना अंधारातून उजेडात आणावे . अन्यथा लोकहितासाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असा सज्जड इशारा आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला आहे .