राज्यातील गोरगरीब कष्टकऱ्यांना भरीव मदत द्या: प्रा.शरद पाटील : जनता दलातर्फे राज्यपालांना निवेदन
उमेश पाटील -सांगली
कोरोना महामारीमुळे राज्यातील छोटे व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी,घरेलू कामगार, बांधकाम मजूर, नाभिक, चर्मकार,परीट, शेतमजूर, मोलमजूर, शेतकरी यांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाने यांना भरीव मदत करावी.तसेच ज्यांना १५०० रुपये मदत जाहीर केली आहे.त्या मदतीत वाढ करावी, या मागणीचे निवेदन जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.शरद पाटील, युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना दिले आहे.
राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, राज्यातील छोटे व्यवसायिक व कष्टकऱ्यांमध्ये येणाऱ्या सर्व घटकांना न्याय मिळावा. तसेच शेतकरी बांधव घरेलु कामगार बांधकाम मजूर, नाभिक, चर्मकार, परीट बांधवांना शासनाने भरघोस मदत करावी.तसेच राज्यातील पत्रकार बांधव आपला जीव धोक्यात घालून कोरोना महामारीचे वृत्तांकन करीत आहेत.त्यांनाही फ्रंट लाईन दर्जा देवून सर्वांना किमान १० हजार रुपये सरकारने दयावेत असे आदेश राज्यपालांनी महाराष्ट्र सरकारला दयावेत अशा मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
राज्यातील वृध्द शेतकऱ्यांना दरमहा ५००० हजार रुपये पेन्शन लागू करावी, खासगी दवाखान्यातील उपचार घेणारे सर्व कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा.वाढत्या इंधन दरवाढीमुळे होणारी महागाई कमी करावी व शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न अशा विविध मागण्यांबाबत जनता दलाच्या वतीने प्रा.पाटील,शेवाळे व शिष्टमंडळाने राज्यपाल कोशारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. राज्यपाल कोशारी यांनी प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.यावेळी राज्यपाल यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचेशी दूरध्वनीवरून संवाद साधून महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्यावतीने चांगले काम सुरू असून पक्षाचे पदाधिकारी जनतेच्या प्रश्नांवर जागृत असल्याबाबत गौरवोद्गारही काढले.
यावेळी सुमित संजय पाटील, संग्राम शेवाळे, भिमराव धुळप, अजय गलांडे, राहुल गवाळे उपस्थित होते.