मंत्री आदिती तटकरेंचे काम चांगले
उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते श्रीवर्धनमध्ये कामांचे भूमिपूजन
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
मंत्री म्हणून अदिती तटकरे या चांगलं काम करत आहे, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पर्यावरण राज्यमंत्री अदितीताई तटकरे यांचं कौतुक केलं. ते शुक्रवारी दि 4 रोजी श्रीवर्धन येथे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्रीवर्धन मधील बीच सुशोभीकरण व 23 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी खासदार सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष महमद भाई मेमन, तहसीलदार सचिन गोसावी, प्रांत अमित शेडगे तसेच मुख्याधिकारी किरणकुमार मोरे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, अदिती तटकरे यांचे काम चांगले आहे, त्या जर कमी पडल्या तर त्यांचे वडील म्हणजेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे कामं करुवून घेतात. काम चांगलं झालं पाहिजे, नाहीतर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही, हे आधीच सांगून ठेवतोय. मी स्पष्ट बोलतो. ते पुढे म्हणाले की, पाच वर्षात चार वादळं आली. सरकार पाठिशी आहे, केंद्र सरकारचे नियम लहान असतील तरी साडेतीनपट पैसे देण्याचं काम राज्याने केलं. कोरोना कसा अटॅक करेल सांगता येत नाही. नियम ठरवून दिल्याप्रमाणे पालन करण्याचं आपलं काम आहे. आतताईपणा जीवावर बेततोय, असं अजितदादा पवारांनी सांगितलं. कुणालाही वाटलं नव्हतं की मविआची स्थापना होईल आणि आपलं सरकार येईल. पण कामाला सुरुवात करताच कोरोनाने प्रवेश केला. 14 महिने झाले राज्याच्या तिजोरीत येणारा पैसा कमी झाला, असं त्यांनी नमूद केलं.
श्रीवर्धनच्या विकासात माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले साहेब, र.ना.राऊत साहेब, खा. सुनिल तटकरे साहेब यांचे मोठे योगदान आहे. येथील मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशिल आहे. श्रीवर्धनला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी तसेच, स्थानिक नागरीकांना पर्यटनातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी बोलताना सांगितले. बॅरिस्टर अंतुले साहेब यांनी पाहिलेले सागरी महामार्गाचे स्वप्न, तसेच हर्णे, जिवना आणि आगरदांडा या बंदरांची कामे व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची कामे यापुढे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याने पूर्ण होतील, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. प्रसंगी रा. कॉं. पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेशजी लाड, आ. अनिकेतभाई तटकरे, आ. बाळाराम पाटील, जि.प.उपाध्यक्ष सुधाकर घारे, दाजी विचारे, नगराध्यक्ष फैजल हुर्जूक, नगरसेवक श्री. जितेंद्र सातनाक, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, जिल्हाधिकारी श्रीम. निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे आदी. उपस्थित होते.
हेरिटेज ट्री संकल्पना
चक्रीवादळाने बाप-दादांनी लावलेली झाडं कोलमडून पडली. मात्र आता पावसाळ्यात चौपट झाडं लावा. 100 वर्षापूर्वीच्या झाडांसाठी हेरीटेज ट्री संकल्पना राबवा असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. ही झाडं तोडता येणार नाहीत, त्याला कायद्याचं संरक्षण असेल, वाऱ्याच्या वेगाला टिकणाऱ्या झाडांची वानवा आहे. लॅंडस्केपिंग करताना झाडांचा विचार व्हायला हवा. असं अजितदादा पवार म्हणाले.