सव्वाशे वर्षांपूर्वीच्या प्लेग महामारीत शाहू राजांनी केलेले कार्य आजही अनुकरणीय - प्रा. डाॅ. विलासराव पोवार.
उमेश पाटील-सांगली
'राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेगच्या महामारीत राज्यकर्त्याच्या भूमिकेतून मानवतेचा दृष्टिकोन ठेवत प्रशासकीय, प्रबोधन, आरोग्य, उपचार, आर्थिक मदत, पुर्नवसन या पातळ्यांवर केलेल्या शास्त्रशुद्ध उपाययोजना आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक तसेच अनुकरणीय आहेत.' असे प्रतिपादन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डाॅ. विलासराव पोवार यानी केले.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या जून अंकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख वक्ता म्हणून डॉ. पवार 'प्लेगच्या साथीतील शाहू महाराजांचे कार्य' या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे होते.
शाहू महाराजांनी,त्याकाळी रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन केले,अपंग दिनदुबळे व गरजूंसाठी अन्नदानाची सोय केली.मजुरांना काम उपलब्ध केले .सर्व धर्माच्या यात्रा-जत्रावर बंधने घातली. साठेबाजी करून महागाई करणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवले .
प्लेगने मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन दिली ", जनतेचे दागदागिने मौल्यवान वस्तू राजदरबारातील तिजोरीत सुरक्षित ठेवण्याची सोय केली. प्लेगची लस सर्वप्रथम स्वत टोचून घेतली, लस टोचून घेणार्यास रजा, रोख बक्षिसे जाहिर केली.
शाहू महाराजांनी लोकानुनय न करता प्लेग निर्मूलनासाठी जे जे शास्त्रीय उपाय आहेत त्यांची कठोर अंमलबजावणी केली. अशा अनेक उपाय योजनांची माहिती डॉ. पवार यांनी शाहू महाराजांनी प्रसृत केलेला प्लेगविरोधी जाहीरनामा, करवीर सरकारचे गॅझेट व वेळोवेळी काढलेल्या अधिकृत हुकुमाधारे दिली.
देशातील इतर संस्थानात व ब्रिटिश अमलात प्लेग धुमाकूळ घालत असताना कोल्हापूर संस्थानात मात्र शाहू महाराजांनी अतिशय शास्त्रीय पद्धतीने प्लेगच्या महामारीवर नियंत्रण ठेवण्याचा व संस्थानातील शेवटातील शेवटच्या माणसाच्या संरक्षणाचा विचार करीत कशा उपाययोजना केल्या याचे तपशीलवार विवेचन डॉ. पवार यांनी आपल्या भाषणात केले.
व्याख्यानापूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या हस्ते जूनच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तात्राच्या जून २०२१ अंकाचे प्रकाशन झाले .
पत्रकार विजय चोरमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, 'जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही ज्याला शाहू राजाचा स्पर्श झालेला नाही' असे प्रतिपादन करीत शाहू महाराज व आजचे राज्यकर्ते यांची तुलना करताना ते पुढे म्हणाले , पंचवीस वर्ष वय असणारे तरूण शाहू राजे प्लेग महामारीवर मात करताना वैज्ञानिक दृष्टिकोन वापरत होते पण आजचे राज्यकर्ते, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा असले भंपक कार्यक्रम करत आहेत. महाराजांनी टीका करणाऱ्या वृत्तपत्रानाही मोठ्या मनाने मदत केली तर आजचे राज्यकर्ते माध्यमांची मुस्कटदाबी करतात." असे प्रतिपादन करून "राज्यकारभार करताना अडचण आली तर शाहूंनी केलेल्या कार्याचा अभ्यास करावा म्हणजे त्यांना मार्ग सापडेल" ,असा सल्ला चोरमारे यांनी आजच्या राज्यकर्त्यांना दिला.
कार्यक्रमाची सुरुवात अण्णा कडलास्कर यांच्या शाहू राजांवरील स्वरचित गीताने केली. प्रास्ताविक व ओळख अनिल चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर गायकवाड यांनी केले .सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले. कार्यक्रमास राज्यभरातील २०० अंनिस कार्यकर्ते ऑनलाईन उपस्थित होते.