आ .शिवेंद्रसिंहराजेंमुळे शाहुनगरमध्ये होणार नवीन पाईपलाईन
प्रतीक मिसाळ- सातारा
सातारा- शाहूनगर परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्येत कमालीची वाढ होत आहे . नवीन पाईपलाईनची वाढती मागणी , जुन्या पाईपलाईनला सतत लागणारी गळती , अपुरा आणि कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा यामुळे शाहुनगर परिसरातील नागरिक वैतागले आहेत . त्यामुळे भविष्याची गरज ओळखून शाहूनगरमधील पाईपलाईन बदलण्याच्या सूचना आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या आहेत . पाणीपुरवठा योग्यरीत्या होत नसल्याने पाईपलाईन बदलण्याची वेळ आली असून योग्य व्यासाची पाईपलाईन टाकण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होवू लागली . याबाबत नागरिकांनी आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन हि समस्या सोडवण्याची मागणी केली . त्यानंतर शाहुनगर , जगतापवाडी परिसरात १६० मीमी व्यासाची नवीन पाईपलाईनसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचित केले आहे . तत्काळ जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरतूद करून नवीन पाईपलाईन टाकावी अशा सूचना आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या . यावेळी ऋतुराज देशमुख , मंदार कोळी , संदीप जगताप , नीतीराज सूर्यवंशी , विनोद धुमाळ , राजेश कदम यांच्यासह शाहुनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .