बिबट्याचा वावर
कृष्णा वारणा काठावर भीतीचे वातावरण
उमेश पाटील -सांगली
काही महिन्यांपूर्वी सांगली शहरात बिबट्या आल्याची वार्ता अजून लोक विसरले नसतानाच आता सांगलीपासून जवळच असलेल्या कसबे डिग्रज (ता. मिरज)येथे पहाटे बिबट्या आल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. कसबे डिग्रज गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे.
शुक्रवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान कसबे डिग्रज मधील नितीन माने या युवकाने सर्वप्रथम बिबट्या पाहिला. त्यानंतर रात्री दिडच्या सुमारास बिबट्याने गावातील बागणवाट जवळील हॉटेल शिलेदार येथील आत मध्ये असलेल्या कुत्र्याला भक्ष्य बनवण्याच्या उद्देशातून हल्ला केला. हल्ल्याच्या उद्देशातून हॉटेलच्या पत्र्यातुन आत जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे प्रयत्न असफल ठरले. हॉटेल शिलेदार शेजारील सुकुमार दूधगावे यांच्या शेतात मोठ्या ठश्यासोबतच लहान ठसेही आढळल्याने या बिबट्या सोबत लहान बछडा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिबट्या आल्याची बातमी समजताच वनविभाग आणि संबंधित लोकांनी येऊन तात्काळ पंचनामा केला आहे. दरम्यान वन विभागाकडील माहितीनुसार हा बिबट्याच असल्याचे सांगण्यात आले. ठस्यांच्या अंदाजावरून तो साधारणपणे चार वर्षांचा असल्याचे समजते. बिबट्याच्या शोधासाठी वनविभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बिबट्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कसबे डिग्रजसह आजूबाजुच्या गावातील लोकांनीही सतर्क राहण्यास सांगितले आहे.स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून दवंडी देऊन ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बिबट्याच्या शोध मोहिमेमध्ये वनरक्षक सागर थोरवत सहाय्यक इकबाल पठाण संभाजी ढवळे तसेच जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सचिन डांगे, रामचंद्र मासाळ, संजय शिंदे आदींनी सहभाग घेतला
-कसबे डिग्रज आणि शेजारील परिसरातील शेतामध्ये सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. सदर परिसरातील शेतकरी वर्गाने शेतीची कामे तात्काळ थांबवावे. तसेच कोणतीही अफवा न पसरवता बिबट्याची माहिती मिळताच वन खात्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांनी केले आहे.