ऊस बिलासाठी खासदार संजय पाटील यांच्या कार्यालयावर धडक
स्वाभिमानी'चे आंदोलन शुक्रवारपर्यंत बिले न दिल्यास चिंचणी येथील खासदारांच्या निवासस्थानासमोर बेमुदत ठिय्या
सुधीर पाटील -सांगली
तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने अनेक शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहेत. ऊस नेऊन पाच महिने होत आले तरी अनेकांना दमडीही दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या मार्केट यार्डातील कार्यालयावर धडक मारली.
यावेळी शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांना पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची ग्वाही कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी दिली. दरम्यान, जर शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत तर खासदार पाटील यांच्या चिंचणी येथील निवासस्थानासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
खासदार पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने जानेवारीपासून गाळप झालेल्या उसाची बिले अद्याप दिली नाहीत. ही बिले मिळावीत, यासाठी शेतकरी कारखाना स्थळावर हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांची कोणीही दखल घेत नाही. गेल्या काही महिन्यात खासदार पाटील यांनी शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली 16 एप्रिल रोजी नागेवाडी कारखान्यासमोर आंदोलन केले होते. यावेळी खासदारांनी 30 एप्रिलपर्यंत बिले देण्याचा शब्द दिला होता. मात्र एप्रिलनंतर मे संपून जून महिना सुरू झाला तरी अद्याप शेतकऱ्यांना बिले मिळावी नाही. खासदारांनी आपला शब्द पाळला नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, खासदार पाटील यांच्याकडून ऊस बिले देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने सोमवारी संतप्त शेतकऱ्यांनी तासगाव येथील चिंचणी नाक्यात रास्ता रोको केला. त्यानंतर ऊस बिल आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, एकच गट्टी, राजू शेट्टी' अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी खासदार पाटील यांच्या मार्केट यार्डातील कार्यालयावर चाल केली. कार्यालयासमोरही शेतकऱ्यांनी आक्रोश केला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, लॉकडाऊनमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामासाठी बि - बियाणे, खते घेण्यासाठी बळीराजाकडे पैसे नाहीत. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी कारखानदारांच्या दारात जाऊन भीक मागावी लागत आहे. पण आता आम्ही अटीतटीची लढाई लढू. ऊस बिल पदरात पाडूनच घेऊ. संजय पाटील यांना शेतकऱ्यांनी दोनवेळा खासदार केले. मात्र त्यांनाच ठेंगा दाखवला जात आहे. जर शुक्रवारपर्यंत बिले मिळाली नाहीत तर खासदारांच्या बंगल्यासमोर बेमुदत ठिय्या मारू.
आंदोलनात तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अशोक खाडे, दामाजी डुबल, राजेंद्र माने, शशिकांत माने, संदेश पाटील, सचिन पाटील, महेश पाटील, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते