माथेरान अनलॉक होण्याच्या मार्गावर? जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत
चंद्रकांत सुतार--माथेरान
माथेरान पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या माथेरान मधील नागरिकांना लॉक डाऊन काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विविध भागातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपासाठी मदतीचा हातभार लागत असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागत आहे परंतु अन्य महत्वाच्या बाबींसाठी आर्थिक चणचण मोठया प्रमाणावर जाणवत आहे यासाठी माथेरान लवकरात लवकर अनलॉक करण्यात यावे यासाठी विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी सातत्याने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पाठपुरावा केला होता.मेलद्वारे सुध्दा निवेदन सादर केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांना चर्चेसाठी बोलावले होते.त्यामुळे आज दि.८ रोजी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन माथेरान अनलॉक करावे याबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली आहे.
माथेरान मध्ये कोरोना रुग्णांची संख्या नगण्य असून ४५ वर्षावरील नागरिकांचे कोव्हीड लसीकरणचे एकएक डोस जवळजवळ पूर्ण झाले आहे.त्यामुळे इथे जास्त प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत नाहीत.नागरिक आपली स्वतःची आणि इतरांची सुध्दा जबाबदारी घेत आहेत. पोलीस प्रशासन सुध्दाआपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. नगरपरिषदेच्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी वर्ग दिवसरात्र मेहनत घेत आहेत त्यामुळे गावातील नागरिक कोरोना पासून सुरक्षित आहेत.१४ एप्रिल पासून लॉक डाऊन जाहीर झाल्यामुळे दोन महिन्यांचा कालावधी होत आल्याने इथे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या सर्व नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे त्यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि नगरपरिषद सभागृह गटनेते प्रसाद सावंत यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन इथली एकंदरीत भौगोलिक परिस्थिती समजावून सांगितली आहे त्यानुसार माथेरान १५ जुननंतर अनलॉक होईल? असे जिल्हाधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान दिसून येत आहे.