शेगांव (बु. ) येथे जुगार अड्ड्यावर छापा : ७ लाखांच्या मुद्देमालासह १७ जुगाऱ्यांना अटक
राजेंद्र मर्दाने-चंद्रपूर
वरोरा तालुक्यातील शेगांव (बु.) येथील गजानन शेंडे यांच्या घरात बेकायदेशीर व राजरोसपणे चाललेल्या जुगार अड्ड्यावर शेगांव बु.पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा टाकला. यात १७ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडून त्यांच्या कडून ७ लाखांच्या वर मुद्देमाल जप्त केला. कारवाई केलेल्या मध्ये वरोरा, शेगांव बु. कोरा, बिजोणी, भेंडाळा येथील जुगाऱ्यांचा समावेश आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेगांव (बु.) येथील गजानन शेंडे यांच्या राहत्या घरी काही दिवसांपासून बेकायदेशीर व राजरोसपणे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती खबरी द्वारा शेगांव पो.स्टे.चे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांना मिळाली. त्यांनी चिमूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन बगाटे यांना याबाबत सूचित केले. घरात चालत असलेल्या जुगारासाठी रितसर सर्च वारंट काढून पोलीस पथकाला घेऊन घरात चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर छापामार कारवाई केली. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या गजानन शेंडे, अविनाश देवतळे, अशोक लाडे, रोशन भगत, अमोल भगत रा. शेगांव (बु.), जगदसिंह अकाली, जगतपालसिंह अकाली, मंगेश गुडदे, सचिन लोंखते, विक्की पखाले, सचिन धारणे रा. कोरा, दिवाकर कापसे, मोहित मून रा. बिजोणी, अविनाश देवतळे, प्रवीण डाखरे रा. भेंडाळा, आमिर अली, मोहसीन अली, सोमा कुचनकर रा. वरोरा अशा १७ जुगाऱ्यांना तीन पत्ती व कट पान खेळताना रंगेहाथ पकडून त्याचे कडून ३ लाख १८ हजार ७५० रुपये रोखसह १४ नग मोबाईल किंमत १ लाख ४१ हजार, ५ दुचाकी किंमत २ लाख ६० हजार, बावन पत्त्याचा तास असा एकूण ७ लाख २० हजार ५५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. १७ जुगाऱ्यांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुधीर बोरकुटे ,पी एस आय जाधव, पीएसआय सरोदे व पोलीस कर्मचारी आदींनी महत्वाची कामगिरी बजावली.