Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मुख्यमंत्री संवाद कार्यक्रमात मिळाली मनोगत व्यक्त करण्याची संधी

 ठाणे जिल्ह्यातील सरपंच रघुनाथ खाकर आणि आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडीवले यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी साधला संवाद 


मुख्यमंत्री संवाद कार्यक्रमात मिळाली मनोगत व्यक्त करण्याची संधी

सुधाकर वाघ-मुरबाड

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सोमवार(ता.7) रोजी राज्यातील सरपंच आणि आशा स्वयंसेविका यांच्याशी संवाद साधला. या संवादाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील वाल्हीव्हरे गावचे सरपंच रघुनाथ खाकर आणि कळबांड गावच्या आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडीवले यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. या दोघांनी मनोगत व्यक्त करताना आपापल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि कोरोनावर नियंत्रण मिळवताना कशाप्रकारे उपाययोजनांकरण्यात आल्या यांची माहिती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सांगितली.  



सरपंच खाकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की  आमच्या गावात अद्याप एकही कोरोनाचा आढलेला नसून गाव पूर्णतः कोरोनामुक्त आहे. गावात संसर्ग होऊ नये यासाठी मार्च 2020 लाच गाव लॉकडाऊन केले. गाव दक्षता कमिटी स्थापन करून नागरिकांना कोरोना या विषाणूची आणि लक्षणाची माहिती दिली. नागरिकांची भीती कमी करून त्रिसूत्रीचे नियम पटवून दिले. गावाला वारंवार हात धुण्याची सवय लावली. गाव मालशेजच्या पायथ्याशी असल्याने पर्यटकांची गर्दी होऊ नये यासाठी गर्दी नियंत्रणावर भर दिला. संपूर्ण गावात आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप केले. गावातील प्रत्येक नागरिकाचे सर्वेक्षण केले. तसेच गावातल्याच जंगलात मिळणारी ‘गुळवेल’ गावातल्या प्रत्येक घरात वाटप केले त्यामुळे लोकांनी ‘गुळवेल’ चा काढा प्यायले. त्याचबरोबर गावातील जास्तीत नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात यश आले. तिसऱ्या लाटेची देखील गावाची तयारी केली असून गावकरी उत्तम सहकार्य करत आहेत त्यामुळे गाव अखेरपर्यंत कोरोनामुक्त राहील असा ठाम निर्धार सरपंच रघुनाथ खाकर यांनी मुख्यमंत्री यांच्याशी बोलताना व्यक्त केला.


त्याचबरोबर आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडीवले यांनी  देखील कोरोनाच्या काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाच्या वेळी सर्वेक्षण करून कोरोना रूग्णासह क्षयरोग, मधुमेह कर्करोग, सारी, उच्चरक्तदाब,आदि आजाराच्या व्यक्तींना देखील संदर्भसेवा दिल्याचे मुख्यमंत्री यांना सांगितले. दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या सरपंच संवाद कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार  आणि सरपंच उपस्थित होते. तर आशा स्वयंसेविका संवाद कार्यक्रमावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे, आशा स्वयंसेविका उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies