रावे येथे गावठी हातभट्टी धंद्यावर कारवाई
दोन आरोपींना अटक ; दादर सागरी पोलिसांची कारवाई
देवा पेरवी-पेण
पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रावे गावातील गावठी हातभट्टी धंद्यावर दादर सागरी पोलिसांनी कारवाई करुन 1300 लिटर रसायन व दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे ड्रम व इतर साहित्य असा एकूण 64 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दादर सागरी पोलिसांना गुप्त माहितीदारा मार्फत रावे येथे गावठी हातभट्टीचा धंदा सुरु असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी उप निरीक्षक के.आर.भऊड, अमर पवार व पोलीस कर्मचाऱ्यांसह गुरुवारी रावे गावातील खाडी भाग येथे छापा टाकून सहा हात भट्ट्या उध्वस्त केल्या. यावेळी दोन आरोपी हातभट्टी चालवत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी 1300 लिटर दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन, ड्रम असे 64 हजार रुपयांचे साहित्य आढळुन आले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या बाबत अधिक तपास दादर सागरी पोलीस करत आहेत.