शिवशंभो प्रतिष्ठानकडून जीवनावश्यक साहित्याचे वाटप
सुधाकर वाघ-मुरबाड
मुरबाड तालुक्यातील वेळूक व आळवे या गावांमध्ये शिवशंभो प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेकडून जवळपास 175 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वीच्या कालावधीला 'आघोट' म्हणतात. या आघोटीला सर्वसामान्य कुटुंबांकडे आर्थिक चणचण असते. यावर्षीची कोरोनाकाळातील आघोट तर गरीब कुटुंबांसाठी खूपच हलाखीची आहे. अशा परिस्थितीत शिवशंभो प्रतिष्ठानने गरजू कुटुंबाना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या कांदा,बटाटा व लसूण आदी वस्तूंचे पॅकेट्सचे वाटप केले. वेळूक व आळवे या गावांतील जवळपास 175 गरजू कुटुंबांना त्याचा लाभ झाला. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गरजूंना बऱ्यापैकी मदत आली होती. परंतु यंदाच्या लॉकडाऊन काळात कोणी फिरकलेसुद्धा नाही. म्हणून आम्ही गरजूंना थोडा आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.असे शिवशंभो प्रतिष्ठानचे सदस्य दिगंबर शिंगोळे यांनी सांगितले.
या साहित्याचे वाटप करतेवेळी मुरबाड पंचायत समिती माजी सभापती व पंचायत समिती सदस्य दत्तू गणपत वाघ व शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वारघडे , सचिव संदिप वारघडे तसेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या शिवशंभो प्रतिष्ठानच्या या सामाजिक जाणिवेचे समाजाच्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.