सांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:
अवैधरित्या बाळगलेले ३८ पक्षी व प्राणी घेतले ताब्यात
- प्राणीमित्र अशोक लकड़े यांच्या घरावर वनविभागाने टाकला छापा
- प्राणीमित्रावर गुन्हा
उमेश पाटील-सांगली
सांगलीच्या वन विभागाने गुरुवारी सांगलीत विजयनगर भागात राहणाऱ्या एका प्राणी मित्राच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत अधिकाऱ्यांनी प्राणी मित्राच्या घरात अवैधरित्या बाळगलेले विविध जातीचे ३८ पक्षी व प्राणी ताब्यात घेऊन बेकायदा वन्यपक्षी व प्राणी बाळगल्याप्रकरणी 'त्या' प्राणीमित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यामध्ये संशयित अशोक लकडे (रा. पार्श्वनाथ नगर, विजयनगर सांगली) असे त्या प्राणी मित्राचे नाव आहे. त्याला लवकरच अटक करून यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबत सखोल चौकशी करणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक विजय माने यांनी दिली.
अशोक लकडे याने त्याच्या घरात गेल्या काही वर्षापासून अवैधरित्या विविध जातीचे प्राणी आणि पक्षी बाळगल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशोक लकडे याच्या ताब्यातील २६ घारी, १ घुबड, १ गाय बगळा, २ कांडे करकोच,१ गरुड, २ माकड, ४ कासव व एक मृत घार अशी ३८ पक्षी व प्राणी ताब्यात घेतले आहेत.
याबाबत वन अधिकारी यांनी दिलेली माहिती अशी, प्राणीमित्र अशोक लकड़े विजयनगर भागात राहतो. त्याने विविध प्रकारची वन्यपक्षी व प्राणी बेकायदा बाळगुन ते पक्षी आपल्या घरातील बंद पिंजऱ्यात ठेवले असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार उपवनसंरक्षक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, युवराज पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी अशोक लकडे याच्या घरावर छापा टाकला. यावेळी परिसर पाहणी केली असता अशोक लकडे यांनी विविध प्रकारची वन्यपक्षी, प्राणी बेकायदा बाळगुन पिंजऱ्यात ठेवल्याचे आढळून आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व पक्षी व प्राणी यांचा पंचनामा करून ताब्यात घेतले आणि अशोक लकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ताब्यात घेतलेले सर्व पक्षी व प्राणी वनविभागाच्या वन्य प्राणी उपचार केंद्रात ठेवले आहेत. मिरजेतील पशुवैद्यकीय डाॅक्टरांना पाचारण करून पक्षी व प्राणी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यापैकी बरेच पक्षी व प्राणी तंदुरुस्त आहेत. तर काही पक्षांची शारीरिक प्रकृती खालावली आहे.त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्यातील वन्यप्राणी रेसक्यु सेंटरकडे पाठविण्यात येणार आहे. उर्वरित पक्षी, प्राणी दंडोबा येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक माने यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी करीत आहेत.
बेकायदा पक्षी व प्राणी बाळगणे कायद्याने गुन्हा
बेकायदा पक्षी व प्राणी बाळगल्याप्रकरणी जिल्ह्यात वन विभागाची ही पहिलीच कारवाई असून कोणतेही वन्यपक्षी अथवा प्राणी स्वत:जवळ बेकायदा बाळगणे हा गुन्हा आहे. असा प्रकार कुठे आढळल्यास सांगली वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपवनसंरक्षक विजय माने यांनी केले आहे.