सुकेळी ते कोलेटीपर्यंतच्या महामार्गाच्या कामाला गती न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्र पत्रकार संघ करणार ठिय्या आंदोलन
पेण प्रांतांना दिल निवेदन
महाराष्ट्र मिरर टीम-पेण
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग दोन पदरी असताना अपघातांचे प्रमाण वाढल्याने चौपदरीकरणाची मागणी कशेडी घाटामध्ये तीन वेळा रास्ता रोको आंदोलन करून पूर्णत्वास नेण्याचा अनुभव आहे. सुकेळी खिंडीपासून कोलेटीपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा दर्जा व गती पाहता या कामाला गती न मिळाल्यास येत्या स्वातंत्र्यदिनी याच महामार्गावर स्थानिकांच्या सहभागाने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी पेण येथे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना एका निवेदनाद्वारे दिला.
यावेळी महाड येथील संघटक निलेश पवार आणि नागोठणे येथील संघटक राज वैशंपायन हे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासोबतच्या चर्चेत सहभागी झाले.
यावेळी नागोठणे येथील संघटक राज वैशंपायन यांनी, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर चौपदरीकरणाच्या कामाचा वेग वाढला असताना पेण उपविभागातील सुकेळी खिंड ते नागोठणेदरम्यानच्या कोलेटी भागातील चौपदरीकरणाचे काम अद्याप ठप्प झालेले दिसून येत आहे, अशी वस्तुस्थिती मांडून, या भागातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची सद्यस्थिती अतिशय बिकट असल्याचे सांगितले. आतापर्यंत सुकेळी खिंड ते कोलेटी व नागोठणेदरम्यानच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या विविध अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू तर अनेक जणांना जायबंदी व्हावे लागले आहे.यामुळे स्थानिक जनता या रस्त्याच्या सुस्थितीसाठी आग्रही असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी, नजिकच्या काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग खड्डयांतून शोधण्याची वेळ वाहन चालकांवर येणार आहे एवढी दुरवस्था या महामार्गाची झाली असून केवळ महामार्गाची मागणी करून अंदमानात जाण्यापेक्षा महामार्गाचा दर्जा आणि गुणवत्ता तसेच कामाची गती याबाबतही स्थानिक पत्रकार असल्याने आग्रही असल्याचे सांगून निवेदनाची दखल तातडीने घेऊन येत्या स्वातंत्र्यदिनापूर्वी तातडीने सुकेळी खिंड ते कोलेटी या कामाची गती वाढली नाही तर नियोजनबध्द आंदोलनाचा अनुभव पणास लावून जनआंदोलन छेडले जाईल, असे यावेळी सांगितले.
प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा शाखेच्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन सर्व संबंधितांची तातडीने बैठक बोलवून होणाऱ्या निर्णयासंदर्भात पत्रकार संघाला माहिती अहवाल देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.
अतिशय चांगली मांडणी... बातमीतील महत्वाचा मुद्दा हायलाईट केल्यामुळे वाचकांना नेमकं काय वाचावे, हे सहज लक्षात येते.
ReplyDelete