राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महागाई विरोधात एल्गार
ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर टीम
कर्जत तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने टिळक चौकात आज इंधन दरवाढ ,गॅस दरवाढ आणि वाढती महागाई यांच्या विरोधात जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथे एल्गार पुकारण्यात आला.यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनाला जिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव,तानाजी चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले.यावेळी भाषण करताना जिल्हाध्यक्ष सुरेश लाड म्हणाले,काँग्रेस पक्षाच्या कालावधीत 350 रुपयांना मिळणारा सिलेंडर आज 800 रुपये पार करून गेला आहे तसेच 50 ते 55 रुपयांना मिळणारे पेट्रोल आज 100 रुपयांच्या वर गेले आहे,काँग्रेस पक्षाच्या कालावधीत पेट्रोलचे दोन पाच रुपयांची दरवाढ झाली तर लगेचच आंदोलन करणारे आज जनसामान्यांच्या बाजूने उभे राहताना दिसत नाहीत मुग गिळून गप्प बसले आहेत.इंधन दरवाढ झाल्याने महागाई वाढली आहे,कोरोनाच्या संकटकाळी दिलासा देण्याऐवजी या सरकारने लोकांचे कंबरडे मोडले याचा जनतेने विचार करावा असेही ते पुढे म्हणाले.