महाडच्या महापूरात निरंकारी सेवादलांचे सेवेसाठी योगदान
दररोज 200 स्वयंसेवक खाकी वर्दीमध्ये करत आहेत बाधित घरांची साफसफाई
कडधान्यांसह जीवनावश्यक साहित्यांचे केले जातेय वाटप
महाराष्ट्र मिरर टीम-महाड
रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक महाड शहरात मोठ्या प्रमाणात महापुराच्या पाण्याने नुकसान केले आहे. शेकडो दुकानांसह घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून तेथील घरांची साफसफाई करण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या रायगड 40 (ए) झोनच्या अंतर्गत रायगड क्षेत्रातील सेवादलांची मोठी तुकडी गेली चार दिवस खाकी वर्दीमध्ये सेवा करीत आहे. हे सेवाकार्य पूर्ण शहरातील बाधित नागरिकांच्या घरांची साफसफाई होई पर्यंत सुरू राहणार आहे.
संत निरंकारी मंडळ गेली 90 वर्षाहून अधिक काळ मानवतेच्या कार्यात समरस राहून सर्वव्यापी निराकार परमेश्वराची ओळख समस्त मानवमात्राला देऊन खरा भक्तिमार्ग दाखवीत आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील भरीव योगदान देऊन रक्तदान, नेत्रदान, नेत्रचिकित्सा शिबिर, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आपत्कालीन मदत इ.उपक्रम संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत आहे. संत निरंकारी मंडळाचे खाकी, निळी वर्दीमधील स्वयंसेवक विविध सेवाकार्यात समर्पित भावाने गुरुकार्याला प्राधान्य देऊन सेवा करतात.
गुरुवारी झालेल्या महापुराच्या दुर्घटनेत महाड शहरात पुराच्या पाण्याने शेकडो दुकानांसह घरांमधील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच संत निरंकारी मंडळाच्या मुख्य कार्यालय दिल्ली येथे केंद्रीय अधिकारी यांना कळवून शनिवार पासून सेवेसाठी झोन रायगड 40 (ए) चे झोनल प्रमुख प्रकाश म्हात्रे आणि क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील, महाड सेक्टर संयोजक दयाळ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल महाड युनिट संचालक नथुराम निंबरे, बिरवाडी युनिट इंचार्ज काशिनाथ पवार व रायगड क्षेत्रातील सेवादलांच्या 20 युनिटच्या माध्यमातून दररोज दीडशे ते दोनशे पुरुष सेवादल खाकी गणवेशात दिवसभर पुरातील बाधित घरांची साफसफाई करण्यासाठी सेवा देत आहेत.
महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या निर्देशानुसार सेवादलांच्या तुकड्या तुकड्यांनी नवेनगर परिसरापासून साफसफाईची सुरुवात करण्यात आली असून शहरातील पूर्ण घरांची साफसफाई केली जाणार आहे. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील तसेच पुणे, मुंबई येथून प्राप्त झालेल्या कडधान्यांसह जीवनावश्यक साहित्यांचे देखील वाटप केले जात आहे.