हुडीबाबा ! Bajaj Caliber ची पुन्हा होणार एंट्री,
दमदार इंजिन-लेटेस्ट फीचर्ससह होणार पुनरागमन
ज्ञान-तंत्रज्ञान
अनुप ढम
भारतात ९० च्या दशकात बजाज ऑटो आणि कावासाकी यांनी संयुक्त उपक्रमांतर्गत अनेक एंट्री-लेवल कम्यूटर मोटरसायकल्स लाँच केल्या होत्या, त्यात Bajaj Caliber देखील होती. कॅलिबर सर्वप्रथम १९९८ मध्ये लाँच झाली आणि अल्पावधीतच ही बाइक रायडर्समध्ये चांगलीच लोकप्रिय झाली. या बाइकची टॅगलाइन 'हुडीबाबा' अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. आता 'हुडीबाबा' भारतात पुन्हा एकदा लाँच होणार असून आधीपेक्षा दमदार अंदाजात भारताच्या मार्केटमध्ये एंट्री घेण्याच्या तयारीत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजाज ऑटोने मार्च महिन्यात भारतात कॅलिबर नावाच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता. या ट्रेडमार्कसाठी मंजुरीही मिळाली आहे, त्यामुळे कंपनी या नावाचा आता वापर करू शकते. ही एंट्री-लेवल कम्यूटर सेगमेंटची बाइक असेल जी अपडेटेड फीचर्स आणि डिझाइनसह लाँच होईल. या लोकप्रिय बाइकद्वारे कम्यूटर सेगमेंटमध्ये कंपनीला पुन्हा एकदा दबदबा निर्माण करायचा प्रयत्न असेल.
बजाज ऑटोच्या पोर्टफोलियोमध्ये सध्या १२५cc क्षमतेची यूटिलिटी-बेस्ड बाइक नाहीये, त्यामुळे या सेगमेंटमध्ये कंपनी आपल्या कॅलिबर बाइकला पुन्हा उतरवण्याची शक्यता आहे. या बाइकमध्ये १२५ सीसी क्षमतेच्या इंजिनचा वापर केला जाण्याची शक्यता आहे, मात्र अद्याप कंपीनीकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, बजाज कॅलिबर कंपनीने १९९८ मध्ये लाँच झाली होती, २००६ पर्यंत या बाइकची भारतात विक्री सुरू होती. पहिल्यांदा कंपनीने ही बाइक बाजारात आणली त्यावेळी जाहिरातीत 'हुडिबाबा' टॅगलाइनचा वापर करण्यात आला होता, त्यावेळी ही टॅगलाइन चांगलीच लोकप्रिय ठरली. जुन्या कॅलिबरमध्ये कंपनीने ४-स्पीड गिअरबॉक्स असलेले १११.६ सीसी क्षमतेचे इंजिन दिले होते. हे इंजिन ९.५ bhp मॅक्सिमम पॉवर आणि ९.१० Nm पीक टॉर्क जनरेट करायचं आणि बाइकचा टॉप-स्पीड १०२ किलोमीटर प्रति तास इतका होता. आता पुन्हा एकदा Bajaj Caliber देशातील रस्त्यावर धावण्याच्या तयारीत आहे.