मुरुडमध्ये ढगफुटी ,अनेक गावातून पाणी घुसले
मुरुडचा संपर्क तुटला !
अमूलकुमार जैन -अलिबाग
मुरुड तालुक्यात ढगफुटी झाल्याने अनेक गावात पाणी घुसले असून आपला जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थ छातीभर पाण्यातून कसेबसे बाहेर पडत आहेत.काशिद येथिल नदिवरील पूल काल वाहून गेल्यामुळे अलिबाग-मुरुड रस्ता बंद करुन वाहतूक सुपेगाव मार्गे रस्त्याने करण्यात आली होती परंतु रात्रीपासून संततधार कोसळणार्या पावसाने उसरोली गावाजवळची नदी उलटल्याने हा मार्गही बंद झाला तर रोहा केळघर मार्गावरील कळवट आदिवासी वाडीनजिक दरड कोसळल्याने हा देखिल मार्ग बंद झाला असून भालगाव- तळा इंदापुर मार्गही बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने मुरुडचा संपर्कच तुटला आहे.
रात्रीपासून धुवाॅधार पाऊस कोसळत असून सकाळ पर्य॔त मुरुडमध्ये 348 मिमी.पाऊस झाला आहे.त्यामुळे येथील गावागावातून पाण्याचे लोंढे वाहत आहेत.नांदगाव खारिकवाडा परिसरातील घराघरातून पाणी शिरले लोक जीव वाचविण्यासाठी घराच्या माळ्यावर चढून बसलेत. कित्येकांच्या घरचे भात व इतर अन्नधान्य भिजून,घरातील कपडे भिजून गेले तर पुरात भांडी वाहून गेली आहेत येथिल घरात आठ ते दहा फुटापर्य॔त पाणी चढले होते.नांदगावच्या दवाखान्यातही पाणी भरून मोठे नूकसान झाले असून येथिल तळेकर यांच्या धान्य दळण्याच्या चक्कीत पाणी घुसल्याने दळणांबरोबरच सहा चक्क्यांचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे.ग्रामस्थांनी अनिल कुदुर्से या तरुणाला वाहून जातांना वाचवले असून दगडू पाटील व त्यांच्या पत्नीला बोया व अन्य साहित्यांनी वाचवले आहे.
मजगाव येथिल खारदोडकुले भागातील घरांतून पाणी भरल्याने मोठे नुकसान झाले असून आदाड गावचे गणपती मंदिर पाण्याखाली गेले आहे.येथिल लक्षमिखार,शिघ्रे,मुरुडसह राजपुरी आदी गावांतून पाणी शिरल्याने भरपूर नुकसान झाले आहे.
गेल्या चाळीस वर्षात प्रथमच असा पूर पाहिला .गावातील तरुणांनी नुकसान व जीवितहानी वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. माझे तीनखंडी भात भिजले आहे शिवाय इतर नुकसान आहेच. आता शासनाने मदतीचा हात द्यावा--
नरेश कोर्लेकर-ग्रामस्थ खारिकवाडा
या भागातील पूरपरिस्थिती पाहता एनडी आरएफच्या तुकडीला पाचारण केले आहे.सर्व वरिष्ठांशी संपर्क साधून कल्पना दिली आहे.रस्ते बंद झाल्याने मदतीच्या कामात अडथळे येत आहेत.तरी अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.पूर ओसरल्यानंतर नुकसानीचा अंदाज घेऊ.--
देशमुख-तलाठी सजा-नांदगाव.