श्रीवर्धन परिसरात धुवाधार पाऊस
- दिघी- बोर्ली - श्रीवर्धन मार्ग पाण्याखाली
- - वाहतूक बंद
- - बोर्ली गुडलक मोहल्ला जलमय, घरात घुसले पाणी
- - -नाल्या मध्ये माती, नवीन बांधकाम व अनधिकृत भरावामुळे पाणी तुंबले
- सर्वे गावातील मुख्य रस्त्यावर कोसळली दरड
,
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
तालुक्यामध्ये गेली तीन दिवस धुवाधार पाऊस बरसत आहे. मागील 20 दिवस पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे खोळंबून राहिली होती परंतु पावसाच्या पुन्हा जोरदार आगमनाने शेतकरी वर्ग सुखावला असून सर्वत्र भात लावणीच्या कामाला शेतकरी वर्ग लागला आहे. तर सतत कोसळणाऱ्या पावसाने बोर्ली पंचतन गुडलक मोहल्ला, कार्ले नदी, शिस्ते, कापोली, दिवेआगर भाग जलमय झाला आहे . गुडलक मोहल्ला परिसरात खलिफे चाळी मध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली तर दिघी-बोर्ली- श्रीवर्धन मार्ग सोमवार पहाटे पासून पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद केली होती. बोर्ली पंचतन, शिस्ते मधील नाले पावसाच्या पाण्याने आलेल्या मातीच्या गाळाने बंद झाले तसेच काही ठिकाणी झालेले अनधिकृत माती भराव व घर बांधकाम यामुळे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने पाणी रस्त्यावर व घरामध्ये घुसले याचा फटका नागरिकाना बसला तर कार्ले नदी वडवली नदीचे पाणी देखील रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.
बोर्ली पंचतन परिसरामध्ये शनिवार पासून मान्सून पुन्हा जोरदार सक्रिय झाला. मागील 20 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने व कडक ऊन पडल्यामुळे शेतीची कामे खोळंबून राहिली होती, शेती पूर्ण सुकून जाण्याच्या मार्गावर होती किंबहुना दुबार पेरणी करावी लागते की काय अशा चिंतेत शेतकरी वर्ग होता. पण पावसाने सुरुवात करल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वतावरण आहे. रविवार सकाळ पासूनच पावसाने दमदार बरसण्यास सुरुवात केली संततधार पडणाऱ्या पावसाने बोर्ली पंचतन सह दिवेआगर, शिस्ते, कापोली, गाव जलमय झाले होते. सतत दोन दिवस बरसणारा पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडविली आहे. बोर्ली पंचतन येथील श्रीवर्धन मार्गावर दिवेआगर फाटा जवळील नाला गेली अनेक वर्षे पावसाच्या येणाऱ्या मातीमुळे सतत बंद होत आहे. त्यातच नवीन झालेली बांधकाम व त्यातून नैसर्गिक पाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने गुडलक मोहल्ला भाग पूर्ण जलमय झाला आहे तर खलिफे चाळीतील सर्व खोल्यामध्ये पाणी घुसल्याने तेथील रहिवासी यांची मोठी तारांबळ उडाली. तसेच वडवली भागात असणाऱ्या नदीचे पाणी देखील दरवर्षी रस्त्यावर येत आहे या भागात देखील झालेली मातीची भराव यामुळे नदीचे पाणी इतरत्र घुसत आहे यातमध्ये रस्ताची उंची कमी असल्याने हाबमार्ग दिघी सागरी पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे तर कार्ले नदी मध्ये साचलेला गाळ यामुळे नदी चे पाणी रस्त्यावर येत असून श्रीवर्धन दिघी मार्गावरील वाहतूक यामुळे ठप्प झाली आहे. तर पावसाची सततधार सुरूच असून कार्ले व कुडकी लघु पाटबंधारे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून व कोंढे धरण पूर्ण भरून ओसंडून वाहू लागले आहे.