शिराळा तालुक्यात सरीमागून सरी,
चांदोली धरणाच्या पाणी साठ्यात वाढ.
उमेश पाटील-सांगली
शेतकरी वर्गामध्ये या पावसामुळे समाधान असून , घातीची भांगलन सोडून , चिखलातील भात भांगलन सुरू आहे.
बुधवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. भात लावणीच्या कामांना देखील वेग आला आहे.शिराळा तालुक्यात जून महिन्यात पडलेल्या वादळी पावसाने मोरणा मध्यम प्रकल्पासह लघुपाटबंधारे आणि सर्व पाझर तलाव जून महिन्यातच भरले. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती. कालपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली असून, चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. चांदोली धरणाची साठवण क्षमता ३४ टीएमसी असून, सध्या धरणात २६ टीएमसी पाणीसाठा आहे.एकूण क्षमतेच्या ७५ टक्के धरण भरले आहे.
शिराळा तालुक्यात भात पीक पेरणी आणि लावण अशा दोन्ही पद्धतीने केले जाते. धूळ वाफेवर पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे.तर तालुक्याच्या पश्चिमेकडील पठारी भागात नाचणीचे पीक घेतले जाते. भात लावणीनंतर आता शेतकऱ्यांनी नाचणीच्या लावणीसाठी तयारी सुरू केली आहे. दिवसभर ढग दाटून आल्याने, सूर्याचे दर्शन झाले नाही. सरी मागून सरी कोसळत आहेत.