खत निर्मितीतून सेंद्रिय शेतीला चालना
कर्णबधिर व आदिवासींना मिळणार रोजगार
नरेश कोळंबे-कर्जत
नसरापूर ग्रामपंचायत येथील गणेगाव येथील साई संस्कार ट्रस्ट येथे रविवारी शुभ्रा प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. याठिकाणी गाईच्या शेणापासून बनवलेले सेंद्रिय खत, कंपोस्ट खत, जीवामृत, घनजीवामृत, पर्यावरणपूरक गोवऱ्या, रानभाज्या आदी उपलब्ध असणार आहे. यामुळे सेंद्रिय शेतीच्या वाढीला चालना मिळणार आहे. याप्रसंगी हालीवलीच्या सरपंच प्रमिला बोराडे, विभागप्रमुख सुरेश बोराडे, मनोविकार तज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान तलवारे, प्रकल्पाच्या प्रमुख भाग्यश्री वर्तक, हेमंत कोंडीलकर, योगिता तलवारे, सुजाता आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाग्यश्री वर्तक यांनी सांगितले की, माझे पती दिवंगत राजेंद्र वर्तक हे रिलायन्स उद्योग समूहात उच्च पदावर कार्यरत होते. मात्र त्यांच्या मनात कर्णबधिर मुलांसाठी कार्य करण्याचा हेतू होता. ते कार्य आम्ही दोघांनीही सुरू केले. पुढे आदिवासी भागात काम करण्यास सुरुवात झाली आणि आम्ही सहकार्यासाठी माणसे जोडत गेलो. तसेच गरजू महिलांना मदत करू लागलो. आज या कामाची व्याप्ती वाढली आहे. पुढे आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्वत्र कार्य वाढवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर, हेमंत कोंडीलकर यांनी प्रकल्पाची संकल्पना स्पष्ट केली.
भगवान तलवारे म्हणाले की, हा प्रकल्प म्हणजे भाग्यश्री वर्तक यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. त्यांनी समाजामध्ये एक प्रेरणा निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्यासाठी आमचा कायमच पाठिंबा असेल. तसेच हा प्रकल्प राज्यभर पोहोचवण्यासाठी सोबत असू, असे सांगितले. तर, सुरेश बोराडे यांनी, भाग्यश्री वर्तक यांनी समाजातील दुर्लक्षित घटकांना जवळ करण्याचे मोठे कार्य हाती घेतले आहे ते नक्कीच चांगले आहे. त्यासाठी आम्ही कायमच त्यांच्या सोबत असू, असे सांगितले.