वाईच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे अंगावर छप्पर कोसळल्याने वृद्धाचा मृत्यू
प्रतीक मिसाळ -वाई
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसा पासून सुरु असलेला रिमझिम पाउस आणी वेगवान वाऱ्याने कोंढावळे येथील कातकरी वस्तीत एका छपरात राहणारे वामन जाधव , वय ६५ यांच्या अंगावर गाढ झोपेत असतानाच मध्य रात्री छप्पर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे . अशी माहिती वासोळे गावचे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नवघणे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली . बाजीराव नवघणे पुढे माहिती देताना म्हणाले कि वाई तालुक्यातील पश्चिम भागात कोंढावळे गावाच्या हद्दीतील पुर्व दिशेला असणाऱ्या सुतारकी नावाच्या शिवारातील ओढ्याच्या कडेला गेल्या कित्येक वर्षांपासून पाच ते सहा कुटुंबे गवती छपरे घालून राहत आहेत यापैकी एका छपरात वामन जाधव , वय ६५ हे वयोवृद्ध गृहस्त एकटेच राहत होते त्यांची मुले सुना शेजारच्या छपरात राहत होती . गेल्या दोन दिवसापासून पश्चिम भागात रिमझिम पावसा बरोबर वेगवान वारेही सुरु आहे . या वेगवान वाऱ्याच्या तडाख्यात गाढ झोपेत असणाऱ्या वामन जाधव यांच्या अंगावर मध्य रात्रीच्या वेळी हे छप्पर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी वडील झोपलेले छप्पर जमीनदोस्त झाल्याचे पाहुन वडिलांचा शोध मुलगा आणी सुनेने सुरू केला असता ते सापडत नसल्याने त्यांनी जमीनदोस्त झालेले छप्पर ऊचकटण्यास सुरुवात केल्यावर वामन जाधव हे त्या ठिकाणी मृत अवस्थेत सापडल्याने तेथील नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिटाळून टाकणारा होता . या गरीब कातकरी समाजावर काळाने घाला घातल्याने पश्चिम भागातील गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे . त्यामुळे वाई तालुक्यात पावसासह वाऱ्याने पहिला बळी घेतला आहे . तरी प्रशासनाने मृत वामन जाधव यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी आणी पश्चिम भागातील कातकरी समाजातील लोकांचे सर्वेक्षण करुन त्याना शासकीय जागा ऊपलब्ध करुन घरकुल बांधून द्यावीत अशी मागणी वासोळे गावचे सामाजिक कार्यकर्ते असलेले बाजीराव नवघणे यांनी केली आहे .