कर्जतमधील पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या नागरिकांना तत्काळ मदत करा; खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
पुराचे पाणी शिरलेल्या भागाची केली पाहणी
ज्ञानेश्वर बागडे -महाराष्ट्र मिरर टीम
मागील पाच दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे कर्जत नगरपालिकेच्या 70 टक्के क्षेत्रात पाणी शिरले होते. नदी काठच्या अनेक घरामध्ये पाच ते दहा फूट पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराने नुकसान झालेल्या नागरिकांना तत्काळ मदत करावी. त्याचे पंचनामे करावेत. वीज पुरवठा सुरळीत करावा, पाणी पुरवठा पूर्ववत करावा, असे आदेश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत नगरपालिका क्षेत्रातील उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या भागातील अनेक घरामध्ये पाणी शिरले होते. आज पाऊस थोडा थांबताच खासदार बारणे यांनी थेट कर्जत गाठले. पाणी शिरलेल्या बामचा मळा, इंदिरानगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, शिवम अपारमेंट, आकुर्ली भागातील तीन तास पाहणी केली. नागरिकांना धीर दिला. त्यानंतर प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तत्काळ मदतीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याचबरोबर रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. पुराने बाधित नागरिकांना तत्काळ मदत करण्याच्या त्यांनाही सूचना दिल्या.
नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, मुख्याधिकारी पंकज पाटील, नायब तहसीलदार राठोड, मंडल अधिकारी थिअरीकर, नगरसेवक मनू दांडेकर, नगरसेविका संचिता पाटील, प्राची देवळणकर, माजी नगरसेवक संतोष पाटील, केतन जोशी, संदीप करनुक, संदीप पाटील, ज्ञानेश्वर करनुक बैठकीला उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, कर्जत परिसरात जोरदार पाऊस झाला. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. नदीला पूर आला होता. त्यामुळे कर्जत नगरपालिकेच्या 70 टक्के क्षेत्रात पाणी शिरले होते. पाच ते दहा फूट पाणी नागरिकांच्या घरामध्ये गेले होते. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. टीव्ही, फ्रीज, मिक्सर अशा इलेक्ट्रॉनिक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचबरोबर अन्नधान्याचेही नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने प्राथमिक स्तरावर पंचनामे करावेत. पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून मदत मिळेल. सर्व नुकसान ग्रस्तांना ही मदत मिळावी. अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. विजेची कामे तत्काळ पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करावा. पंपिंग स्टेशनमध्ये पाणी गेल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे विस्कळीत झालेला पाणीपुरवठा तत्काळ पूर्ववत करावा. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.