खोपोलीत साकारलं शहिद अशोक कामते बॅडमिंटन कोर्ट
गुरुनाथ साठेलकर-खोपोली
शहिद अशोक कामते यांच्या नावे बॅडमिंटन हॉलचे उदघाटन माझ्या हस्ते होणे म्हणजे माझे भाग्य आहे, असे प्रतिपादन रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले. अशोक कामते यांच्या सोबत ड्युटी करण्याचा योग आला, त्यावेळी त्यांच्यात दडलेल्या खेळाडूला मी जवळून अनुभवले आहे, किंबहुना मी त्यांना गुरुस्थानी मानतो त्यामुळे मला उदघाटनाचा सार्थ समाधान वाटत असलयाचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही अधिकाऱ्याने आपल्या कार्यकाळात कर्तुत्वाचा ठसा उमटविण्याचे काम केले पाहिजे, हे सूत्र लक्षात घेऊन, खोपोलीचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी पोलीसांच्या फिटनेसकडे कटाक्ष ठेवत, बॅडमिंटन कोर्ट उभारले आणि बहुउद्देशीय सभागृहाचे जे निर्माण केले ते आदर्शवत आहे. या उपक्रमात कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने घेतलेली मेहनत, पंचक्रोशीतील कंपन्यांनी केलेले आर्थिक सहाय्य खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे, असे मत अधीक्षक अशोक दुधे यांनी व्यक्त केले. शासनाच्या निधीतून उपक्रम राबवणारे अनेक अधिकारी आहेत, परंतू लोक सहभागातून अशा उपक्रमांचे निर्माण करण्याची किमया क्षीरसागर यांनी करून दाखवली असे स्पष्टोदगार काढले. क्षीरसागर हे उत्कृष्टपणे आपला कार्यकाळ पूर्ण करून, लवकरच बदलीच्या ठिकाणी जात असल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या.
कोरोनाच्या पार्श्भूमीवर छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. सुरवातीला पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुकला यांच्या हस्ते पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण झाले, तदनंतर बॅडमिंटन कोर्टचे, बहुउद्देशीय सभागृहाचे तसेच नाम फलकांचे अनावरण संपन्न झाले. कायक्रमाची प्रस्तावना करताना पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी कोरोनाचा अडसर असूनही कक्षेबाहेर जाऊन मला काम करण्याची संधी मिळाली असे सांगत, आपल्याला सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी यथायोग्य साथ दिली, त्याच सोबत खोपोलीकरांनी देखील योग्य सहकार्य केले म्हणूच मी नव्याने निर्माण झालेल्या वास्तू उभारू शकलो असे भाव व्यक्त केले.
या सर्व निर्माणासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचा सत्कार अधीक्षकांच्या हस्ते केला गेला.
खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभुते यांनी खोपोली पोलीस ठाण्यातील नवनिर्मित वास्तूंसाठी पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी दोन लाखांचा निधी मंजूर करत क्षीरसागर यांचे भरभरून कौतुक केले.
पोलीस उप निरीक्षक सतीश आस्वर यांनी आभार प्रदर्शनाची औपचारिकता पूर्ण केली तर जगदीश मरागजे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. या निर्मितीसाठी देणगी दिलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी, त्याच प्रमाणे रसायनी व खालापूर या ठिकाणचे पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते. बढतीरूपी बदली झालेल्या पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांना सर्वानी भावपूर्ण निरोप देऊन शुभेच्छा दिल्या