निराधार आधारास मिळे घर!
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक
आदित्य दळवी
महाराष्ट्र मिरर टीम
जिल्हयाच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना त्यांच्या पनवेल तालुक्याच्या दौऱ्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी दत्ता शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांकडून पनवेल तालुक्यातील बाघाचीवाडी, सारसाई, पो. आपटा, ता. पनवेल या आदिवासी पाडयावरील एका कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीची माहिती मिळाली होती.
या कुटुंबातील 2 लहान भावंडे, 1 मुलगी वय वर्ष 9 व 1 मुलगा वय वर्ष 7 हे अनाथ असून त्यांना राहायला नीट घर नाही. त्यांचे वडील हयात नसून आई बेपत्ता आहे. ते त्यांच्या 68 वर्षाच्या आजीबरोबरच कसाबसा उदरनिर्वाह करून लहानशा घरात राहतात. हे घरही मोडकळीला आले असून राहण्यायोग्य नाही. हे कुटूंब घरात पावसाचे पाणी गळत असल्याने शाळेच्या वऱ्हांड्यात झोपत असल्याची माहिती मिळताच पुराने संपूर्ण बाधीत गावाचे योग्य पुर्नवसन करुन पूरबाधितांना दिलासा देणाऱ्या संवेदनशील जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तात्काळ पनवेल तहसिलदार श्री. विजय तळेकर आणि महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा परिविक्षा अधिकारी श्री. अशोक पाटील यांना तात्काळ त्या कुटुंबाचे व मुलांचे योग्य पुर्नवसन करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार दि. 05 ऑगस्ट 2021 रोजी पनवेल तहसिलदार श्री. विजय तळेकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सपकाळ यांनी बाघाची वाडी या आदिवासी पाडयावर भेट देऊन कुटुंबाच्या घराची पाहणी केली. तहसिलदार श्री.तळेकर यांनी कुटुंबाच्या पुर्नवसनाबाबत संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या व महिला व बाल विकास विभागाने मुलांना ताब्यात घेऊन त्यांना एस.ओ.एस. बालग्राम, सोगाव येथे बाल कल्याण समिती रायगड यांच्याकडे दाखल केले.