ठाणे, चंद्रपूर, अकोला येथे वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ओळखले जाणारे डॉ.महेंद्र कल्याणकर रायगड जिल्हाधिकारीपदी रुजू
अमूलकुमार जैन-अलिबाग
रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज सूत्रे स्वीकारली.यापूर्वी ते कामगार आयुक्त म्हणून कार्यरत होते. भारतीय प्रशासन सेवेतील 2007 बॅचचे डॉ.महेंद्र कल्याणकर यांचा यापूर्वी ठाणे जिल्हाधिकारी असताना दोनदा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला होता.
ठाणे येथे जिल्हाधिकारी असताना अल्पावधीतच डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात महसूलवाढीसाठी केलेले प्रयत्न, माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून जनतेला दिलेली शासकीय सेवा, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज, पिक कर्जवाटपात केलेली लक्षणीय वाढ, जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागातून केलेली कामे, शासकीय जत्रेसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून एकाच ठिकाणी केलेले काही लाख दाखल्यांचे वाटप, जिल्हा प्रशासनाचे पहिले कौशल्य विकास केंद्र, सर्वाधिक पेसा गावांसाठी केलेले प्रयत्न या कामांची दखल घेऊन हा विशेष गौरव करण्यात आला होता.
ठाणे येथे जिल्हा प्रशासनाचे कौशल्य विकास केंद्र सुरू करून त्यांनी इतर जिल्ह्यांसमोर आदर्श ठेवला होता. या केंद्रातून अनेक गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील मुलांमुलीनी प्रशिक्षण घेतले व त्यांना नोकऱ्याही लागल्या होत्या. ठाण्यातच जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने एक दिवसभरासाठीच्या सर्वात मोठे नेत्र चिकित्सा शिबिर त्यांनी आयोजित केले होते , या शिबिरात विशेषत: ग्रामीण भागातून शेकडो नागरिकांनी मोफत तपासणी करून घेतली होती.
शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांर्गत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला ‘डिजिटल चॅम्पियनशिप’ डॉ. कल्याणकर यांनी प्राप्त करून दिली. याशिवाय अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या रेतीमाफियांवर सडेतोड कारवाई करून राज्यात सर्वाधिक दंड वसुली त्यांनी करून दिली होती.
ठाणे जिल्ह्यातील दूर्गम भागात कातकरी लोकांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांना ओळख देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कोकण विभागातील हजारो कातकरी कुटुंबांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष तत्काळ लाभ मिळाला. “कातकरी उत्थान योजना” या योजनेत ठाणे जिल्ह्याची कामगिरी त्यामुळे प्रशंसनीय झाली.
जलयुक्त शिवार योजना खेडोपाडी पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी फायदा झाला. बँका आणि वित्तीय संस्थांना कर्ज थकबाकी वसूल करणे सोपे जावे म्हणून जिल्हाधिकारी म्हणून सरफेसी कायद्यात आपल्या अधिकाराचा उपयोग करून या संस्थाना त्यांनी मोठा दिलासा दिला.
त्याचप्रमाणे कामगार आयुक्त म्हणून देखील त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा झाली. औद्योगिक सुरक्षेविषयी त्यांनी जागृती निर्माण केली होती तसेच याविषयी सोप्या भाषेत संबंधित उद्योग-आस्थापना व कामगार यांना माहिती देणारे आकर्षक कॉफी टेबल बुक तयार केले होते.
डॉ.महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) यांचा अल्पपरिचय
- जन्म दिनांक : 10 एप्रिल 1968
- शिक्षण: एलएलएम आणि व्यवस्थापन शास्त्रात डॉक्टरेट
- सन 2008 ते 2010 या कालावधीत माजी मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून काम.
- अकोला महानगरपालिका आयुक्त म्हणून दिनांक 17 फेब्रुवारी 2014 रोजी सूत्रे स्वीकारली. या काळात ग्रीन अकोल्याकरिता पुढाकार तसेच अतिक्रमण हटाव मोहिमा राबविल्या.
- 20 जानेवारी 2015 रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकपदी रुजू.
- चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 30 मे 2015 रोजी कार्यभार स्वीकारला. या कार्यकाळात स्वच्छ भारत मिशनसाठी पुढाकार. विदर्भातील बल्लारपूर एकमेव तालुका हागणदारी मुक्त करण्यात यश.
- यशवंत पंचायत राज पुरस्कार योजनेत ब्रम्हपुरी पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार
- जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणासाठी मिशन नवचेतना पंचायत राज सशक्तीकरण अभियान, कातकरी उत्थान योजना, जलपरिषद, जलयुक्त शिवार, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी
- ठाणे जिल्हाधिकारी म्हणून दि.30 एप्रिल 2016 ते 14 ऑगस्ट 2018 या कालावधीत उल्लेखनीय जबाबदारी पार पाडली.