अखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली
माथेरान काँग्रेस महिला कमिटीचे यश
चंद्रकांत सुतार--माथेरान
अनेक संघर्षाची कडवी आव्हाने पेलत माथेरान करांच्या जवळपास चार दशकांपासून कर्जत ते माथेरान मिनीबस सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष मनोज खेडकर यांना शासनदरबारी पाठपुरावा करावा लागला होता आणि अखेरीस त्यांनी नागरिकांच्या साथीने ११ ऑक्टोबर २०११ मध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली होती. त्यावेळेस कर्जत नेरळ (खांडा )मार्गे माथेरान असा प्रवास सुरू होता परंतु एसटी आगाराच्या गलथान कारभारामुळे ही बस कर्जत वरून सुटल्यानंतर नेरळ येथील हायवेवर उभी करून प्रवाशांची ससेहोलपट करीत होते.माथेरानच्या अनेक प्रवाशांना नेरळ येथून हायवेवर येण्यासाठी ऑटोरिक्षाचा आधार घेऊन यावे लागत होते त्यामुळे ही बाब खूपच खर्चिक बनली होती. याकामी स्थानिक लोकांनी अनेकवेळा कर्जत आगाराला निवेदने सुध्दा दिली होती त्यास या आगाराने थातुरमातुर उत्तरे देऊन पळवाटा काढल्या होत्या. याकामी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वर्षा सुनील शिंदे यांनी आज दि. २ ऑगस्ट रोजी आपल्या महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन थेट कर्जत आगारात आपला मोर्चा नेला शेवटी या आगाराचे प्रमुख शंकर यादव यांनी ही रास्त मागणी मान्य करून या अधिकारी वर्गाने आजपासून नेरळ खांडा येथे मिनीबस नेण्यासाठी चालक वर्गाला सूचना दिल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
यावेळी वर्षा शिंदे यांच्या सोबत कामिनी शिंदे, अर्चना कदम, सुहासिनी दाभेकर आदी महिला उपस्थित होत्या. नव्याने महिला आघाडीच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर नागरिकांची ही महत्वपूर्ण समस्या मार्गी लावल्या बद्दल या टीमचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर,नगरसेवक शिवाजी शिंदे माजी नगरसेवक संतोष लखन यांनी या आघाडी च्या महिलांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.