खोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा
रामायणात खारीचे कर्तृत्व हे सर्वश्रुत आहे. तसंच काहीसं कर्तृत्व खोपोलीतल्या मॅकेनिक या दुर्लक्षित घटकाने करून दाखवलं आहे.
गुरुनाथ साठेलकर-खोपोली
आभाळ फाटलं त्यामुळे कोकण प्रांताची अतिवृष्टी आणि महापुरामुळे दाणदाण उडाली. कोकण वासियांना बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले. जीवनावश्यक वस्तु आणि साहित्याचा ओघ त्यांचा मदतीसाठी वाहू लागला. खोपोली शहरातील मेकॅनिक शाहिद शेख याच्या मनात आपणही मदत करायला हवी ही प्रेरणा जागृत झाली. मात्र आपली आर्थिक परिस्थिती सुमार, त्यात आपण मदत ती काय करणार? अशी शंका उपस्थित होतानाच, आपल्या हाती असलेल्या नादुरुस्त गाड्या दुरुस्त करण्याच्या कलेच्या माध्यमातून मदत करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी खोपोली शहरातल्या सर्व मोटर मॅकेनिक मित्रांशी चर्चा केली. पूरग्रस्त भागात पाणी आणि चिखलामुळे बंद पडलेली वाहनं निशुल्क दुरुस्त करून देण्याचा सर्वानी संकल्प केला. खोपोलीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्पेअरपार्ट दुकानदारांनी त्यांच्या संकल्पनेला हातभार लावला.
शुक्रवार दिनांक ३० जुलै २०२१ रोजी साधारणपणे २० कुशल आणि १५ अकुशल मोटर मॅकेनिक, त्याच्या एका मित्रांने 'ना नफा ना तोटा' तत्वावर दिलेल्या बसने महाडकडे रवाना झाले. महाड शहारात दाखल होताच त्यांनी बस पार्क असून आपली भूमिका त्या ठिकाणी काही लोकांना सांगितली, मात्र त्यांच्या गबाळ्या वेषावरून , हे कसली सेवा देणार? असा ग्रह करून, त्यांना कोणी रिस्पॉन्स दिला नाही. मात्र जिद्द न हरता त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले. त्यांची एकंदर तयारी पाहून सुरवातीला एक दोन मोटारसायकल रिपेअरसाठी त्यांना मिळाल्या आणि त्या त्यांनी अवघ्या काही मिनिटात सुरु करून दिल्या. त्यांच्या या सेवेची चर्चा कानोकान पसरली आणि बघता बघता गाड्यांची रीघ लागली. दिवसभरत शेकडो वाहने या टीमने दुरुस्त केली. ऊन आणि पाऊसाचा मारा झेलत उघड्या रिक्षा स्टॅन्डमध्ये हे मॅकेनिक झटून काम करत राहिले. आपल्याकडचे नवे स्पेअर पार्ट लावून, ऑइल बदली करूनही त्याचे पैसे नाकारताना पाहून महाडकर अचंबित झाले होते. बुडालेली मोटारसायकल रिपेअरसाठी दोन हजाराचा खर्च अपेक्षित होता म्हणून ती रिपेअर करण्यापेक्षा भंगारात विकायला निघालेल्या व्यक्तीची मोटारसायकल या टीमने दुरुस्त करून दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टीमला मोठे समाधान देऊन गेले होते. काहींच्या गाड्या सोसायटीच्या आवारातून ढकलत अणून त्यांनी रिपेअर करून दिल्या. त्यांच्या प्रयत्नाला स्थानिक मॅकेनिकनी पण सहकार्य केले. कित्येकांनी त्यांच्या सेवेच्या बदल्यात पैसे देऊ केले मात्र त्यांनी स्पष्ट नकार देत आपले औदार्य दाखवले. फक्त मोटार सायकल नव्हे तर कार देखील त्यांनी रिपेअर करून दिल्या. नेकना कन्सल्टन्सी दिली. या सर्व टीमची खाण्या पीण्याची जबाबदारी त्यांच्या सॊबत आलेल्या महिला कुटुंबीयांनी घेतली होती. हे मॅकेनिक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पूरग्रस्तांसाठी खोपोली परिसरातून जमा केलेले जे साहित्य आणि धान्य होते ते गरजूंच्या घरी जाऊन वाटले. या टीम मधल्या महिलांनी काही घरात जाऊन घरकामाला हातभार लावला. महाडकर या सर्व प्रकाराने भारावून गेलेलं होते. त्यांच्या या योगदानाबद्दल अनेकांनी आभार व्यक्त केले.
या आगळ्या वेगळ्या अभियानावरून परतताना रात्र झाली होती मात्र सर्व टीमच्या चेहऱ्यावरचा उत्साह मात्र सकाळचाच होता. सामाजिक जडणघडणीत आपणही आपल्या परीने समाजासाठी योगदान देऊ शकतो याची जाणीव सर्वांच्या मानात उभारी घेत होती. यापुढेही याच पद्धतीने पुन्हा मदतीला जाण्याचा इरादा त्यांच्या मनात पक्का झाला होता. त्यांच्या या अभूतपूर्व अभियानचे सर्व स्थरावरून कौतुक होत आहे.