जत तालुक्यातील पाणी प्रश्नासोबत इतर प्रश्नही मार्गी लावू
- पालकमंत्री जयंत पाटील
अवंढीच्या नूतन ग्रामपंचायत इमारतीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
उमेश पाटील -सांगली
आवंढी तालुका जत येथील मागासवर्गीय समाज वस्तीतील विकासकामांचे व आवंढी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार अमोल मिटकरी, प्रांताधिकारी प्रशांत आवटी, माजी आमदार दीपक साळुंखे, आवंढीचे सरपंच अण्णासाहेब कोडग, सुरेश शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जत तालुक्याचा पाणी प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता हे सर्व पाणी प्रश्न जलसंपदा मंत्री म्हणून तातडीने मार्गी लावण्यात आले आहेत. पाणीप्रश्ना व्यतिरिक्तही जतच्या नागरिकांचे इतर प्रश्नही येत्या काळात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होणारी ठिकाणे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात येईल, असे सांगून ते म्हणाले, आवंढी गावात नूतन ग्रामपंचायतीच्या उभारण्यासाठी 20 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यातूनच ही सुसज्ज इमारत उभी झाली आहे. त्याचबरोबर गावच्या शेतीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सुमारे 1.5 किलोमीटरच्या पाईपलाईनचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे. तसेच मानेवाडी रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार अमोल मिटकरी म्हणाले राज्यातील खेडी सक्षम करण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. खेडी सक्षम झाली की राज्य सक्षम होईल. त्यानुसार आवंढी गावासाठी सभामंडप उभारणी व हायमॅक्स दिव्यांसाठी 20 लाखांचा निधी आमदार फंडातून देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात आवंढी चे सरपंच अण्णासाहेब कोडग यांनी गावातील विविध विकास कामांची माहिती दिली. आभार उपसरपंच आण्णासाहेब बाबर यांनी मानले.
प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते मागासवर्गीय समाज वस्तीतील विविध विकासकामांचे व नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.