मुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती
उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय
सुधाकर वाघ-मुरबाड
ठाणे जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र शहराबरोबरच दुर्गम भाग आहे. भिवंडी, कल्याण आणि रेल्वेमार्गालगत असलेल्या शहापूर तालुक्यातील गावांमधील जिल्हा परिषदेच्या पदांना कर्मचाऱ्यांकडून पसंती दिली जाते. तर शहापूरचा दुर्गम भाग, मुरबाड मधील माळशेज घाटालगतचा परिसर आदी भागात अनेक वर्षे पदे रिक्त राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना काहीअंशी मर्यादा येतात. काही वेळा एकाच कर्मचाऱ्यांवर अनेक ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे कर्मचारीही मेटाकुटीला येतात. त्यांना नाहक ग्रामस्थांच्या नाराजीला तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह अनेक जिल्हा परिषद सदस्यांकडून सर्व तालुक्यात समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. त्याला जिल्हा परिषद प्रशासनानेही संमती दिली. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत समुपदेशनाने जवळपास 9 विभागातील 146 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. वरिष्ठ सहायक, सहायक पशुधन विकास अधिकारी, कनिष्ठ सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, महिला व बालविकास विभागातील पर्यवेक्षिका, शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आदींचा त्यात समावेश आहे.