पुराच्या संकटातून सांगलीकरांची कायमची सुटका करा; तातडीने सरसकट भरपाई द्या
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पृथ्वीराज पाटील यांचे निवेदन
उमेश पाटील-सांगली
कृष्णा कृष्णा आणि वारणा या नद्यांना दरवर्षी येणाऱ्या महापुराच्या संकटातून सांगली जिल्ह्याला कायमचे बाहेर काढावे, तसेच यंदा झालेल्या नुकसानीची लोकांना तातडीने सरसकट आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याकडे आज भारती विद्यापीठ, कॅम्पस येथे केली.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत श्री. पाटील यांनी म्हटले की, सांगली जिल्ह्याचे महापूर संकटात अतोनात नुकसान झाले. कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या पुरग्रस्त भागातील लोकांचे मागील काही दिवस तणाव आणि भीतीचे गेले आहेत. प्रत्येक पावसाळ्यात सांगली परिसरात पुराचे संकट तयार होत आहे. त्यामुळे आता तातडीचे आणि दीर्घकालीन उपाय करणे गरजेचे आहे. गेल्या १० दिवसांपासून मी आणि माझे सहकारी या संकटकाळात लोकांच्या सोबत उभे आहोत. ह्या अनुभवातून आम्ही आपल्याला खालील मागण्या करीत आहोत.
सांगलीसाठी स्वतंत्र आपत्ती प्रबंधन यंत्रणा उभारण्यात यावी. पाणी कमी वेळात वाढत असल्याने कोल्हापूरच्या धर्तीवर जी पी एस बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम चा वापर करावा.
धरणे कुठल्या कालावधीत किती भरायची याचे काही निकष ठरलेले आहेत. ते निकष पाळले जातात का, की पहिल्याच टप्प्यात जास्तीत जास्त धरणे भरून घेतली जातात, त्यामुळे ही बिकट परिस्थिती निर्माण होते याची चौकशी व्हावी.
विविध नद्यांतून कृष्णा नदीला मिळणारे पुराचे पाणी हे दुष्काळी भागाकडे वळवावे.
अनधिकृत बांधकामे वाढू नयेत यासाठी विशेष प्रयत्न करावेत. गावभाग, पेठभाग, वखारभाग, शामरावनगर, विठ्ठलनगर, काळीवाट, रामनगर, कर्नाळ रोड, हरीपूर रोड, दत्तनगर, सांगलीवाडी व इतर ठिकाणी पाण्याने वेढलेल्या सर्व कुटुंबांना (उदा. गावभागातील एकूण 5286 घरांपैकी 4400 घरे पाण्यांनी बाधीत झाली तसेच 886 घरांमध्ये पाणी गेले नाही, पण ही घरे पाण्याने वेढलेली होती. गावभागातील सदर 886 कुटुंबांना) तसेच केशवनाथ मंदिर परिसर, पाटील गल्ली, जैन वस्ती परिसर, सरनोबत गल्ली, खाडीलकर गल्ली, जोशी गल्ली, सांभारे रोड व ज्या अपार्टमेंटमध्ये पाणी गेले आहे. त्या अपार्टमेंटमधील वरील फ्लॅटधारकसुध्दा पूर बााधितच आहेत. त्यांचाही सदर मदतीमध्ये समावेश करावा.
पंचनामे होत असताना जे भाडेकरू पुरग्रस्त आहेत, त्यांनाच नुकसान भरपाई मिळावी. काही भाडेकरूंकडे भाडेकरार नसलेमुळे त्यांना सदर भाडेकराराचा आग्रह न धरता संबंधित नगरसेवकांचा ते भाडेकरू असलेबाबतचा दाखला ग्राह्य धरावा व भरपाई त्यांनाच देणेत यावी.
पूरग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना आर्थिक भरपाई देण्यात यावी. शेतीचे नुकसान मोठे आहे. शिवाय शेतकर्यांची वीज बिले आणि कर्जाचे हफ्ते माफ करण्यात यावेत.पूर संकटात अनेक घरांची पडझड झालेली आहे. त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे.
पूर परिस्थितीचा अभ्यास करून धोकादायक भागांचे मॅपिंग करण्यात यावे. रेडझोन मध्ये येणाऱ्या भागांतील नागरीकांचे तत्काळ सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे.