जिल्हा परिषद शाळा बोंडेखळ येथे महिलांसाठी आरोग्य शिबीर व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
सुधाकर वाघ-मुरबाड
मुरबाड तालुक्यातील नामवंत स्त्रीरोग तज्ञ डॉ. जितेंद्र बेंढारी व मेयर फार्मा लि. कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने, शिक्षण विस्तारअधिकारी सुरेश घोलप यांच्या प्रमुख उपस्थित व ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान भगत यांच्या सहकार्याने मुरबाड तालुक्यातील जि.प. शाळा बोंडेखल येथे महिलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
बोंडेखल येथील आदिवासी महिलांची यावेळी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. आर्थिक अडचणीमुळे आदिवासी भागातील महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे त्यांना अनेक दुर्धर आजाराना सामोरे जावे लागते. पैशाअभावी त्या माझ्या दवाखान्यात येत नाहीत यासाठी मी स्वताच त्यांच्यापर्यंत पोहचुन त्यांची मोफत तपासणी व उपचार करतो असे डॉ. बेंढारी यांनी भगवान भगत यांना सांगितल्यानंतर आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. 7 रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील अनेक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच काही दुर्धर आजार असलेल्या काही महिलांना मुरबाड येथील त्यांच्या तन्मय हॉस्पिटलमध्ये बोलावुन मोफत उपचार करण्याचे आश्वासन यावेळी डॉक्टरांनी दिले.
मेयर फार्मा कंपनीचे झोनल मॅनेजर मुकेश आर्या, रिजनल मॅनेजर यशवंत राऊत, जनरल मॅनेजर नरेंद्र मौर्या, कुंदन झोपे, शुभांगी काळे यांच्या सहकार्याने व सरपंच संजय गोडांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम वाघ, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील ग्रामस्थांना तांदुळ , पीठ , गोडेतेळ तुरडाळ ,साखर,चहा,मसाला, हळद, मीठ , फरसाण, बिस्किटे,व कपडे होते. तसेच शाळेतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका सौ.अनुपमा चौधरी, अंगणवाडी शिक्षिका सौ. सुवर्णा गोडांबे मदतीस सौ.लक्ष्मी वाघ,वंदना वाघ, ग्रामस्थ संतोष मुकणे, नितीन वाघ यांनी मेहनत घेतली.