दोन हजारच्या बनावट नोटा प्रकरणी दोघेजण राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात
भिमराव कांबळे -कोल्हापुर
दोन हजाराच्या बनावट नोटा तयार करून बँकेत भरणा करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी आज अटक केली आहे. अनिकेत हळदकर रा.चन्द्रे ता. राधानगरी आणि उत्तम पोवार रा. पालकरवाडी ता.राधानगरी अशी या दोघांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यातील संशयित आरोपी अनिकेत हळदकर याने बँक ऑफ इंडिया शाखेच्या राजारामपुरी येथील शाखेत २ ऑगष्ट २०२१ रोजी २ हजार रुपयांच्या ६७ नोटा भरणा करण्यासाठी आला होता. यामधील १७ नोटा एकाच सिरीयल नंबरच्या असल्याचे आढळले. त्यामुळे बँकेने हळदकर याच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी हळदकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता या नोटा पालकरवाडी येथील उत्तम पोवार याने त्याला दिल्याचे कबुली दिली. यावरून राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षका दीपिका जौंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल समीर शेख आणि सहकाऱ्यांनी मिळून संशयित आरोपी अनिकेत हळदकर आणि उत्तम पोवार या दोघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास राजारामपुरी पोलीस करीत आहेत.