खोपोलीत राजू कुंभार यांनी साकारले "कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल".
गुरुनाथ साठेलकर-खोपोली
कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाचे दि.29 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त साधून उद्घाटन आणि क्रीडा शिक्षकांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. संकुलाचे उद्घाटन रायगड भूषण आणि रायगड केसरी सन्माननीय प्रकाश हातमोडे आणि गोदरेज आणि बॉईस कंपनीचे प्रबंधक तानाजी चव्हाण यांच्या हस्ते झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानीय क्रीडा अधिकारी संदिप वांजळे, छत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर ,दत्तात्रय पालांडे, कर्जत तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भगवान धुळे, सुभाष घासे, दिलीप देशमुख, गुरूनाथ साठेलकर, सुनील नांदे,एकनाथ कुरळे,दिनेश मरागजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते.
या संकुलाची निर्मिती करणाऱ्या राजू कुंभार यांनी कुस्ती या क्रिडाप्रकारात विषेश करून महिला खेळाडूंना निःशुल्क प्रशिक्षण देऊन स्थानिक पातळी पासुन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य दाखविण्याची संधी देणार असल्याचे आणि यापूर्वीपासुन सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगत कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या आशीर्वादाने दैदिप्यमान यश संपादन करु असा संकल्प व्यक्त केला.
रायगड भुषण तथा रायगड श्री प्रकाश हातमोडे यांनी क्रिडा संकुलाची स्वबळावर निर्मिती करणाऱ्या राजू कुंभार यांचे कौतुक करताना त्यानी महिला कुस्ती पटू घडविण्याचा जो ध्यास घेतला आहे त्यासाठी शुभेच्छा देत आपलंही सदैव सहकार्य असेल असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी तानाजी चव्हाण साहेब आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे यांनी आपल्या भावना प्रकट केल्या.
अत्यंत शिस्तबद्ध स्वरूपाच्या आयोजनात काही प्रदर्शनीय कुस्त्यानी रंगत आणली तर क्रिडा शिक्षकांचा यथोच्छ गौरव करण्यात आला.
सूत्र संचलनाच्या माध्यमातून संकुलाचे उद्दिष्ट, निर्मितीसाठी आलेल्या अडचणी, ज्यांनी ज्यांनी केलेले सहकार्य, त्याच सोबत क्रिडा शिक्षकांचा तसेच खेळाडूंचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न जगदीश मरागजे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री भरत शिंदे हयांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कुस्तीची प्रात्यक्षिकं करण्यात आली.
राजू कुंभार यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलातून अभूतपूर्व यश संपादन करण्याचा निर्धार प्रत्येकाने केलाय.
दररोज सायंकाळी कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात महिला व बाल कुस्तीगीराना क्रिडा अधिकारी तथा राज्य कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती राजू कुंभार यांनी दिली.