पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाध्यक्षपदी न्या.मदन गोसावी यांची निवड
संत साहित्य परिषदेकडून घोषणा
प्रियांका ढम-पुणे
कोल्हापूर येथे होणार्या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.न्या.मदन महाराज गोसावी यांची निवड करण्यात आल्याचे संमेलनाचे संयोजक डाॅ.दत्तात्रय डुंबरे यांनी घोषित केले.विश्वात्मक संत साहित्य परिषद,पुणे यांच्याकडून अखिल विश्वातील संत परंपरेचा अभ्यास व संशोधन केले जाते.कोल्हापूर येथे दि.१८/०९/२०२१ रोजी लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकुण चार उमेद्वारांमधून न्या.गोसावी यांच्या नावाची शिफारस परिषदेकडे करण्यात आली.
या बैठकीस पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव डाॅ.विनय देव,वनविभागातील पुणे विभागाचे प्रमुख ह.भ.प.रंगनाथ नाईकडे, याशिवाय गोपीचंद कदम,संत साहित्याचे अभ्यासक डाॅ.दत्तात्रय डुंबरे,महाराष्ट्र राज्य न्यायाधिश संघटनेचे अध्यक्ष दिलीप घुमरे,अॅड धनर्वी कुलकर्णी,रमेश शिंदे,अॅड.अक्षय गोसावी,डाॅ.सर्जेराव जिगे,डाॅ.शिवाजी हुसे,डाॅ.संचिता राऊत,विजय अवचट,रवी पाटील,डाॅ.धैर्यशील सोळुंके,अप्पा महाराज अभंग ,कोल्हापूर वारकरी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव वागवेकर,बापूसाहेब किल्लेदार,बाळकृष्ण महाराज गिरी,डाॅ.दत्तात्रय साठे,डाॅ.पाटील,बाबा पाटील सांगलीकर ,दत्तात्रय वाडेकर,आदी सर्वांची उपस्थिती होती.इंडसमून न्यूज चॅनलचे संचालक अॅड.स्निग्धा गोसावी व शंतनुजी यांच्याकडे प्रसिध्दीची जबाबदारी सोपविण्यात आली.
मदन महाराज गोसावी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायकाची वाडी या छोट्या गावात झाला.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत विधी शाखेतून त्यांचे शिक्षण झाले.पुढे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी न्यायाधिश पदावर काम केले.याशिवाय मंत्रालयात विधी व न्याय खात्याचे सहसचिव म्हणूनही काम केले आहे.सध्या अहमदाबाद येथे राष्ट्रीय कंपनी लवादाचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहे.उच्चपदस्थ अधिकारी असूनही महाराष्ट्रभर त्यांनी कीर्तन प्रवचनांतून जनजागृतीचे खूप मोठे काम केले आहे.अनेक कायदेविषयक शिबीरांचे आयोजन,संतांच्या ग्रंथांचे वाचन व्हावे म्हणून त्यांनी गावोगावी ज्ञानेश्वरी व गाथा अभ्यासवर्ग सुरु केले आहेत.सध्या ते अखिल भारतीय संत परंपरेचा प्रचार डिजीटल माध्यमांतूनही करीत आहेत.
या साहित्य संमेलनाचे यजमान म्हणून श्री क्षेत्र आदमापूर व राधानगरी तालुक्यातील येथील वारकरी संघटनेने जबाबदारी घेतली आहे.याशिवाय औरंगाबाद येथील विवेकानंद महाविद्यालय व भाषा,साहित्य,संस्कती संशोधन परिषद हे ही सहआयोजकाच्या भूमिकेत राहणार असल्याचे डाॅ प्रकाश खांडगे व बाबा पाटील यांनी कळविले आहे.या संमेलनात जगभरातील संत साहित्याचे अभ्यासक व उपासक उपस्थित राहणार आहेत.कोरोना महामारीच्या काळातही संत साहित्याने दिलेली मनःशक्ती याविषयी विशेष परिसंवाद या संमेलनात आयोजित करणार असल्याचे ह.भ.प.रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले आहे.याशिवाय संत साहित्याची संशोधन केंद्र जगभर सुरु व्हावीत यासाठी विशेष कृतीयोजना आखणार असल्याचे डाॅ विनय देव यांनी सांगितले.