नर्सेस अभावी लसीकरणाला लागू शकतो "ब्रेक"
८ केंद्रांवर फक्त ३ नर्स करताहेत लसीकरण.
नरेश कोळंबे -कर्जत
कर्जत तालुक्यातील कडाव आरोग्य केंद्रात नर्स कमी असल्याने वेगाने चालू असलेल्या लसीकरणाच्या कार्याला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कडाव आरोग्य केंद्र अंतर्गत इतर ७ उपकेंद्रे असून तिथे लसीकरण करणाऱ्या फक्त ३ नर्स उपलब्ध असल्याने लसीकरण मोहीम यशस्वी करणे अवघड होऊन बसले आहे. जिल्हा परिषदेत शिक्षण आणि आरोग्य सभापती कर्जत तालुक्याला मिळाले असताना आरोग्य विभागाची ही परवड असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यातील तब्बल २२ उपकेंद्रात योग्य पद्धतीने आणि वेगाने लसीकरण चालू आहे. कडाव उपकेंद्रा अंतर्गत ८ तारखेला कर्जत तालुक्यातील विक्रमी लसीकरण म्हणजेच तब्बल १२०० लस देण्यात आल्या. आरोग्य अधिकारी करत असलेल्या अपार मेहनती मुळे एवढे लसीकरण शक्य झाल्याचे बोलले जात आहे व त्यामुळे कडाव आरोग्य केंद्रांतर्गत आणखी ७ उपकेंद्र असून ह्या सात ही लसीकरण केंद्रांवर लसीकरण वेगाने चालू आहे. परंतु असं असूनही ह्या केंद्रावर लसीकरण करण्यासाठी फक्त ३ नर्स उपलब्ध असल्याने ह्या तिन्ही नर्सला अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. त्यामुळे पुढील लसीकरणासाठी समस्या उभ्या राहू शकतात हे निश्चित झाले आहे. ह्यामध्ये भालीवडी, वैजनाथ , गौरकामत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र इथे आरोग्यसेविका यांची कमतरता आहे. यामधील पोसरी आणि बार्णे येथील पदे भरली असून तांबस येथील आरोग्यसेविका रजेवर आहेत.
ह्या लसीकरण मोहीमेला यशस्वी करण्यासाठी ह्या तिन्ही नर्स अपार कष्ट करत असून त्यांच्या सोबत स्वतः आरोग्य अधिकारी सुध्दा लस देण्यासाठी सरसावलेले दिसत आहेत. बऱ्याच उपकेंद्रात नर्सेस अभावी स्वतः आरोग्य अधिकारी लोकांना लसीकरण करत आहेत. त्यामुळे सर्व पद आणि पदनाम बाजूला ठेवून हे लोक आतोनात मेहनत घेत आहेत. म्हणूनच कडाव प्राथमिक आरोग्य केंद्र पकडुन ८ केंद्रांवर काम करण्यासाठी कमीतकमी ८ नर्स हव्या असताना तिथे फक्त ३ च नर्स काम करत असल्याने ही विसंगती लवकरात लवकर भरून काढावी आणि नवीन आणखी नर्स ची पूर्तता ह्या उपकेंद्रात करावी अशी मागणी सर्व ग्रामस्थ करत आहेत.