मुरुडच्या सुभाषचंद्र बोस नगर मधील वादग्रस्त साकव नगरपरिषदेने न तोडल्यास भाजप नागरिकांना घेऊन तोडेल- महेश मोहितेंचा इशारा
अमूलकुमार जैन-अलिबाग
मुरुड नगरपरिषद हद्दीतील सुभाषचंद्र बोस नगर(शेगवाडा) मधील अपार्टमेंट हाॅटेल समोरील सन 2014-15 मध्ये 6 लाख 65 हजार निधी खर्चून स्लॅब ऐवजी पाईप टाकून बांधलेल्या वादग्रस्त साकवामुळे नागरिकांना पावसाळी हंगामात त्रास सहन करावा लागत असल्यास जिल्हाधिकार्यांनी ते तोडून टाकण्याचे पत्र दिले असतांनाही ते अद्याप न तोडल्याने ते येत्या 30तारखे पर्यंत न तोडल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी ते तोडेल व यावेळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी नगरपरिषदेवर राहिल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अॅड महेश मोहिते यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
सुभाषचंद्र बोस नगर (शेगवाडा) परिसरातील जवळपास दिडशे ते दोनशे लोकांच्या वस्तीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी येथिल गटारावर स्लॅब टाकणे गरजेचे असांना तेथे तीन छोटे पाईप टाकून बांधकाम करुन मोठा भ्रष्टाचार केल्याने पावसाळी हंगामात येथे साठणार्या पाण्याचा निचरा होत नाही तर तिन ते चार फूट पाणी भरते.त्याचा त्रास येथिल जनतेला सहन करावा लागतो.स्थानिक समाजसेवक अरविंद गायकर यांनी या संदर्भात केलेल्या उपोषणालाभाजपानेहीपाठींबादिलाहोता.त्या वेळी सदर काम तोडून स्लॅब टाकण्याचे दिलेले अश्वासन पाळण्यात आलेले नाही.लोकांना त्रास होत असेल तर बांधकाम तोडण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले होते.तत्कालीन मुख्याधिकार्यांनीही तोडण्याचे अश्वासन दिले होते .त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.
आता आम्ही 30 तारखेची डेड लाईन दिली आहे.त्या दिवशी नगरपरिषदेची सभा आहे त्यात आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास येथिल नागरिकांना सोबत घेऊन भाजप तोडेलअसे मोहिते पुढे म्हणाले.
भविष्यात नगरपरिषदेतील भ्रष्टाचार भाजप बाहेर काढणार आहे.नगरपरिषदेने क्रीडासंकुला साठी शेगवाड्यातील शासनाने आरक्षित केलेली जागा सत्ताधार्यांनी ठराव करुन रेसिडेन्शिअल झोनमध्ये बदलून बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव रचला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.सहायक नगररचना आयुक्तांच्या पत्रावरुन ते सिध्द झाले आहे.राज्यातील भाजपाची सत्ता बदलताच हे आरक्षण रद्द करुन मुरुड मधिल होतकरु क्रीडापटुंवर सत्ताधार्यांनी मोठा अन्याय केला आहे.तर ही जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याच्या या कृती विरोधात आम्ही मोठे जन आंदोलन छेडू असेही ते म्हणाले.
येथील ग्रामिण रूग्णालयाच्या दुरुस्तीच्या कामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे तोही आम्ही लवकरच बाहेर काढु असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.या प्रसंगी शेगवाड्यातील सुधिर पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. पत्रकार परिषदेला भाजपाचे तालुकाध्यक्ष महेंद्र चौलकर,उपाध्यक्ष विनोद भगत,संघटन सरचिटणीस प्रविण बैकर,महेश मानकर, अभिजीत पानवलकर, भायदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.